जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ताठ कणा’ | पुढारी

जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ताठ कणा’

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या १५ व्या ‘जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये टॉर्च कँम्पेन (TORCH CAMPAIGN) या विभागात डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘ताठ कणा’ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. या संबधीची घोषणा नुकतीच मान्यवरांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमात करण्यात आली. ‘प्रज्ञा क्रिएशन्सचे विजय मुडशिंगीकर, व ‘स्प्रिंग समर फिल्मचे करण रावत यांनी ‘ताठ कणा’चित्रपटाची निर्मिती केली आहे.

या महोत्सवामध्ये निवड झाल्याचा आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते म्हणाले की, या महोत्सवाच्या आयोजकांचे मी आभार व्यक्त करतो की, अशा प्रकारचा महोत्सव आयोजित करत त्यांनी टॉर्च कॅम्पेन याअंतर्गत भारतीय चित्रपटांसाठी व्यासपीठ निर्माण केलं. डॉक्टरांच्या जीवनावर आधारित चित्रपट करणे आमच्यासाठी एक आव्हान होते. कारण जे आहे ते दाखवणं ही आमच्यासाठी कसोटी होती. या चित्रपटासाठी आम्ही बराच रिसर्च केला. ‘ही फक्त एका डॉक्टरची कथा नाही तर प्रत्येक माणसाची आणि त्याच्यातल्या माणुसकीची ही गोष्ट आहे जी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. एक माणूस कोणत्याही अपेक्षेविना झपाट्याने एवढं काम करतो ही या चित्रपटातून शिकण्यासारखी गोष्ट असल्याचे गिरीश मोहिते यांनी यावेळी सांगितले.

माणसांचा मोठेपणा हा त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध होत असतो. डॉ. रामाणी यांनी ते सिद्ध केलं अशा यशस्वी माणसांची ओळख सर्वसामान्यांना व्हावी म्हणून ‘ताठ कणा’ चित्रपटाची निर्मिती केल्याचे निर्माते विजय मुडशिंगीकर यांनी सांगितले. पैशापेक्षा रुग्णाचा आनंद मोलाचा मानणारा सेवाव्रती डॉ. विरळाच. महोत्सवात ‘ताठ कणा’ चित्रपटाची दखल घेतल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया करण्यात अतिशय निष्णात अशा जागतिक तज्ज्ञांमध्ये डॉ. प्रेमानंद रामाणी यांचे नाव घेतले जाते. चित्रपटात डॉ. रामाणी यांची भूमिका अभिनेता उमेश कामत यांनी साकारली आहे. दिप्ती देवी, सायली संजीव, अजित भुरे, शैलेश दातार, सुयोग गोऱ्हे संजीव झोटांगीया आदि कलाकारांच्या ही यात भूमिका आहेत.

‘ताठ कणा’चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले आहे. छायांकन कृष्णकुमार सोरेन व संकलन निलेश गावंड यांचे आहे. निर्मिती प्रमुख जितेंद्र भोसले आहेत. कलादिग्दर्शनाची जबाबदारी महेश कुडाळकर यांनी सांभाळली आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे आहे. प्रशांत पवार कार्यकारी निर्माते आहेत.

Back to top button