'बडे मियाँ छोटे मियाँ' हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे आता या सिनेमात विश्वसुंदरी मानुषी छिल्लरदेखील दिसणार असल्याचे समोर आले आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' या सिनेमात अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. हिंदी सिनेसृष्टीतील हा सर्वात मोठा अॅक्शनपट असेल, अशी वदंता आहे. जानेवारी 2023 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून त्याचे निर्माते आहेत वाशू आणि जॅकी भगनानी. मिस वर्ल्ड मानुषी या सिनेमात मुख्य नायिकेच्या भूमकेत दिसणार आहे. मानुषी याआधीदेखील 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमात खिलाडी कुमारसोबत दिसून आली होती. आता पुन्हा एकदा 'बडे मियाँ छोटे मियाँ' या सिनेमाच्या माध्यमातून अक्षयसोबत ती चंदेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.