इफ्फी – स्थानिक प्रतिभा पोहोचली आंतरराष्ट्रीय स्तरावर : अनुराग ठाकूर | पुढारी

इफ्फी - स्थानिक प्रतिभा पोहोचली आंतरराष्ट्रीय स्तरावर : अनुराग ठाकूर

पणजी : पुढारी वृत्तसेवा – चित्रपटाच्या बाबतीत स्थानिक, प्रादेशिक असे आता राहिलेले नाही. सर्व काही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहे. स्थानिक, प्रादेशिक प्रतिभेने देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक संपादन केलेले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी केले. येथील एका तारांकित हॉटेलमध्ये फिल्म बझारचे उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री एल. मुरुगन, गीतकार प्रसून जोशी, सचिव अपूर्वा चंद्रा आदी उपस्थित होते.

ठाकूर म्हणाले, समाजमाध्यमांमुळे चित्रपट निर्मिती एका अर्थाने सोपीही झालेली आहे. मोबाईलच्या माध्यमातूनही तुम्ही तुमची गोष्ट सांगू शकता. ओटीटीच्या माध्यमातूनही तरुणांना आता चित्रपट निर्मितीमुळे चांगला महसूल मिळत आहे. या माध्यमांचा तरुणांनी यथोचित वापर करून घ्यावा आणि कमाईदेखील करावी.

ठाकूर म्हणाले, आपल्या परंपरेमध्ये गोष्ट सांगण्याला खूप महत्त्व आहे. पूर्वीच्या काळात घरातील ज्येष्ठ मंडळी, आजी-आजोबा नातवांना गोष्टी सांगायच्या. आता हे घडते आहे का? आजी-आजोबा तरुणांना गोष्ट सांगतात का? आजी-आजोबांना तरुण वेळ देतात का?
प्रसून जोशी म्हणाले, सध्या प्रेक्षकांच्या संख्येपेक्षा चित्रकर्मींची संख्या जास्त झालेली आहे. प्रेक्षक कमी आणि चित्रपट निर्माण करणारे जास्त असे समीकरण बदलत्या तंत्रज्ञानामुळे घडलेले आहे. तुम्ही गोष्ट सांगायला लागलात तर समोरचा माणूस थांबा, माझ्या मोबाईलवर माझी एक गोष्ट आहे ती आधी दाखवतो, असे सांगतो.

75 सृजनशील तरुणांचा गौरव

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, स्टार्टअप इंडिया मोहिमेत देशातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. चित्रपट निर्मितीमध्येही मोठ्या संख्येने तरुण सहभागी आहेत. 75 सृजनशील मने (क्रिएटीव्ह माईंडस्) या उपक्रमामध्ये देशभरातून तरुणांनी सहभाग घेतला आहे. आजादी का अमृतमहोत्सव या निमित्ताने हा उपक्रम राबवला. सृजनशील तरुण-तरुणांचा शोध घेत त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यात आला. त्यांचे सर्व प्रकारचे व्हिडिओज पाहण्याचे कामच दहा दिवस चाललेले होते. पणजीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या 75 तरुणांचा गौरव करण्यात आला. यावेळी गायक प्रसून जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

चित्रपट प्रदर्शनपूर्व प्रेक्षक चाचणी अमान्य

पणजी ः नितीन मोहिते
चित्रपट निर्मितीवेळी तसेच निर्मितीनंतरही मी कधीही प्रेक्षक चाचणी करत नाही. माझ्या चित्रपटाचा मीच केवळ प्रेक्षक असतो. निर्मितीनंतर माझी चित्रपट निर्मिती समजून न घेणारे प्रेक्षक येतील की काय? याची मला भीती वाटत असते. तसे प्रेक्षक माझे चित्रपट पाहण्यास येऊ नयेत, असे मला वाटते, असे अत्यंत संवेदनशील मनोगत दिग्गज चित्रपट दिग्दर्शक सुजित सरकार यांनी व्यक्त केले. इफ्फीच्या संवादसत्रामध्ये ते बोलत होते. त्यांच्यासह दिग्दर्शक अद्वैत चंदन यांच्याशी हिमेश मंकड यांनी संवाद साधला. चित्रपट निर्मिती एक सामुहिक कला अशा या संवादाचा विषय होता. सरकार म्हणाले, की चित्रपट निर्मिती करताना निश्तिच केलेले ध्येय साध्य करण्यासाठी आपण प्रामाणिक काम करतो. ते करताना प्रेक्षकांचा विचार करत नाही. कारण सर्वच चित्रपट हे सर्वच प्रेक्षकांच्या आवडीचे बनत नसतात. आपल्या कलाकृतीच्या परीक्षणासाठी आपणच मोठे परीक्षक असतो. चित्रपट सृष्टीत दबाव नाही. दबाव हा आपण केलेल्या चुकांमध्ये तयार होतो. चांगले काम केले तर दबाव येण्याचा प्रश्नच येत नाही. मागील चित्रपटावेळी केलेल्या चुका सुधारणे, हेच आपल्या समोर आव्हान असते.

अद्वैत चंदन म्हणाले, की चांगली चित्रपट निर्मिती करण्यासाठी अनुभव महत्त्वाचा असतो. त्यामुळे सेटवर काम करताना आपण सहकार्‍यांशी चर्चा करतो. जर तुमच्याकडे 40 वर्षांचे 10 सहकारी असतील तर 400 वर्षांचा अनुभव असतो. सहकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय हा आपल्यालाच घ्यावा लागते. यश सर्वांसोबत साजरे केले पाहिजे आणि अपयशाची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे.

Back to top button