गोवा : IFFI मध्ये संदीप पाठक-अश्विनी गिरी यांचा मूकपट ‘राख’ | पुढारी

गोवा : IFFI मध्ये संदीप पाठक-अश्विनी गिरी यांचा मूकपट 'राख'

पुढारी ऑनलाईन : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म बझारमध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये यावर्षी ‘राख’ या मराठी चित्रपटाची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच जाहीर केले आहे. दरवर्षी या महोत्सवात चित्रपट सृष्टीतील दर्जेदार चित्रपटांची निवड होवून भारतासोबत जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित केले जातात.

‘राख’ या बहुचर्चित चित्रपटास त्याच्या प्रदर्शनापूर्वीच अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त झाले आहेत, विशेष म्हणजे ‘राख’ हा एक संपूर्ण मूकपट आहे. चित्रपटसृष्टीत या प्रयोगाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ‘राख’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केले असून योगेश गोलतकर, कुणाल प्रभू व राजेश चव्हाण यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात संदीप पाठक व अश्विनी गिरी हे दर्जेदार कलाकार प्रमुख भूमिकेत असून या दोन्ही कलाकारांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात आहे. यात अचानक उद्भवलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना रोजगार गमावू लागला, विपरीत परिणाम होऊन बेरोजगारीच्या संकटात भरडल्या गेलेल्या स्थलांतरित मजुरांच्या दाहक वास्तवाचे चित्रण या चित्रपटात केले गेले आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI), आशियातील सर्वात जुना व भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २० नोव्हेंबरपासून गोवा येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर महोत्सवातील फिल्म बझारमध्ये निवड झाल्याने ‘राख’ या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक यांनी व्यवस्थापक- संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन तसेच एन.एफ.डी.सी. व निवड समितीतील तज्ज्ञांचे आभार व्यक्त केले.

हेही वाचलंत का? 

Back to top button