‘सुर्या’ विरोधात खलनायकांची फौज | पुढारी

‘सुर्या’ विरोधात खलनायकांची फौज

पुढारी ऑनलाईन :  आगामी ‘सुर्या’ या मराठी चित्रपटात मराठी-हिंदीतील सशक्त अभिनेत्यांची फौज आपल्याला खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटाच्या नायकाचा सामना या सर्व खलनायकांशी होणार आहे. या चित्रपटात अखिलेन्द्र मिश्रा, हेमंत बिर्जे, हॅरी जोश, उदय टिकेकर, गणेश यादव खलनायक म्‍हणून दिसतील.

प्रसाद मंगेश हा युवा अभिनेता आपल्याला ‘सुर्या’च्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सचा ‘सुर्या’ हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट ६ जानेवारीला नवीन वर्षारंभी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हसनैन हैद्राबादवाला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटातील हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते अखिलेन्द्र मिश्रा यात ‘नारूअण्णा’ या गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘रज्जाक’ या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी विश्वातील डॉनची भूमिका हेमंत बिर्जे यांनी साकारली आहे. हॅरी जोश हे ‘मुन्ना रेड्डी’ या डॉनच्या व्यक्तिरेखेत दिसतील. उदय टिकेकर हे तात्या पाटील या विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार असून उदयसिंह मोरे ही खाकी वर्दीतल्या खलनायकाची भूमिका अभिनेता गणेश यादव यांनी साकारली आहे. अॅक्शन डिरेक्टर अब्बास अली मोघल आणि कौशल-मोझेस यांचे आहे.

चित्रपटाची कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम, मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे.  नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीव यांचे आहेत. बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संजय मिश्रा, देव चौहान यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली असून सह निर्मिती प्रसाद मंगेश, चेतन मंगेश यांची आहे. कार्यकारी निर्माते संग्राम शिर्के आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button