सांगली : 'गाथा नवनाथांची' या मालिकेतील कलाकारांनी घेतले श्री रेवणनाथांचे दर्शन | पुढारी

सांगली : 'गाथा नवनाथांची' या मालिकेतील कलाकारांनी घेतले श्री रेवणनाथांचे दर्शन

विटा; पुढारी वृत्तसेवा : ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतील कलाकार आणि त्यांची टीम गुरुवारी (29 सप्टें) विटा जवळली श्री क्षेत्र रेणावी (ता. खानापूर) येथील श्री रेवणनाथांचे दर्शन घेतले. महाराष्ट्रात किंवा देशात नवनाथांच्या भक्ती पेक्षा त्यांच्या चमत्काराचीच चर्चा जास्त होते. परिणामी नाथभक्ती सांप्रदायांत अध्यात्मापेक्षा अंधश्रद्धाच जास्त आहे की काय असे वाटून अनेकजण या पासून दूर आहेत. अशा मंडळींना नाथ संप्रदायाची महती ‘गाथा नवनाथांची ‘या मालिकेतून सांगण्याचा आमचा मानस असेल्याचे यावेळी मालिकेतील कलाकारांनी सांगितले.

या मालिकेतील मच्छिंद्रनाथांची भूमिका करणारे जयेश शिवलकर आणि गोरक्षनाथांची भूमिका केलेले नकुल घाणेकर हे दर्शनासाठी आले होते. या वेळी श्रीक्षेत्रावर ह.भ.प.बाळकृष्ण मुळे यांचा कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम सुरू होता. त्यांनी या कीर्तन सेवेचा लाभ घेतला. यानंतर श्री रेवण सिद्धांच्या गाभाऱ्यामध्ये या मंडळींनी दर्शन घेतले.

यावेळी पुजारी प्रवीण गुरव, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव, सोमनाथ गुरव यांनी त्यांना श्री रेवणसिद्धांच्या अवतारांची तसेच मंदिरातील श्री रेवणनाथांची शिलारूपी मूर्ती आणि आत्मलिंगाची माहिती दिली. या आत्मलिंगातून निर्झराच्या स्वरूपात बारमाही पाणी वाहत असते. तेथील तीर्थ प्राशन करून आम्ही धन्य झाल्याची भावना या कलाकारांनी व्यक्त केली. यानंतर या कलाकारांचा देवस्थान ट्रस्टच्या ऑफिसमध्ये सत्कार करण्यात आला.

हेही वाचा

Back to top button