परतीच्या पावसात भुतवडा ओव्हरफ्लो, जामखेडच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला | पुढारी

परतीच्या पावसात भुतवडा ओव्हरफ्लो, जामखेडच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला

जामखेड : पुढारी वृतसेवा  :  जामखेडला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे यावर अवलंबून असणार्‍या जामखेडचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे जामखेडकरांनी भूतवडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने समाधान व्यक्त केले.  शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव रविवारी (दि.26) सकाळी ओव्हरफ्लो झाला. यामुळे शहर व पाच वाड्यावस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा दूर झाला आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे, तसेच या तलावाच्या शेजारील शेतकर्‍यांना तलाव ओव्हरफ्लो झाल्याने शेतीसाठी फायदा होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी सौताडा (ता.पाटोदा, जि. बीड) परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सौताडा येथील रामेश्वर धबधबा ओसंडून वाहत आहे.त्यामुळे शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला 119 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेला भूतवडा तलाव भरला आहे. या तलावाशेजारी जोडतलाव असून, त्याची क्षमता 49 दशलक्ष घनफूट आहे. या दोन्ही तलावात पाणी जाण्यासाठी एक चारी आहे. त्या चारीमुळे जोडतला वही भरला आहे. दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जामखेडचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बारा महिने मार्गी लागत आहे. भुतवडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने विंचरणा नदी वाहती झाली आहे. विंचरणा नदीला पाणी आल्याने रत्नापूरच्या काजेवाडी तलावात पाण्याची आवक सुरू झाली आहे.

खोलीकरणामुळे साठवण क्षमता वाढली
माजी मंत्री राम शिंदे यांनी भूतवडा जोड तलावाच्या चारीसाठी निधी उपलब्ध केला. त्यामुळे भुतवडा जोड तलावामुळे पाणी साठवण क्षमता वाढली. 2019तलाव कोरडा पडल्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ग्रोमार्फत, आमदार सुरेश धस, जैन संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवत तलावातील गाळ काढल्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढली आहे. 2020 ते 2022मध्ये सलग तीन वर्षे भुतवडा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराला पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. प्रशासनानेही पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाणीटंचाई शहराला भासणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जलपूजन
शहराला पाणी पुरवठा करणारा भुतवडा तलाव भरल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जलपूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button