

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारला (Akshay Kumar) प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायलाही आवडते. या अभिनेत्याने केवळ भारतातच नाही तर परदेशातही अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. अलीकडेच एक बातमी समोर आली आहे की, अक्षय कुमारने अंधेरी पश्चिम भागात असलेली त्याची एक मालमत्ता विकली आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने अंधेरीतील फ्लॅट अरमान आणि अमान मलिकचे वडील डब्बू मलिक यांना विकला आहे. (Akshay Kumar)
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने हा फ्लॅट ६ कोटींना विकल्याची माहिती आहे. रिपोर्ट्सनुसार, डब्बू मलिक आणि अक्षय कुमार यांच्यात हा करार ऑगस्ट २०२२ मध्ये झाला होता. ही मालमत्ता अंधेरी पश्चिम येथे आहे. हा फ्लॅट १ हजार २८१ स्क्वेअर फूट + ५९ स्क्वेअर फूटचा आहे. अक्षय कुमारने नोव्हेंबर २०१७ मध्ये ही प्रॉपर्टी ४.१२ कोटी रुपयांना खरेदी केली होती.
एवढेच नाही तर २०१७ मध्ये त्याने आणखी तीन मालमत्ता खरेदी केल्या होत्या, ज्यांची एकूण किंमत १५.१ कोटी रुपये होती. याशिवाय अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या नावावर इतरही अनेक मालमत्ता आहेत.
अनेक अहवालांनुसार, खिलाडी कुमारला समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवायला आवडते, म्हणूनच त्याने मुंबईतील घराव्यतिरिक्त मॉरिशसमध्ये समुद्रकिनारी एक मोठी मालमत्ता खरेदी केली आहे.
एवढेच नाही तर त्याने गोव्यात एक सुंदर विंटेज 'पोर्तुगीज व्हिला' विकत घेतला आहे, ज्याची किंमत सुमारे ५ कोटी रुपये आहे. तो अनेकवेळा कुटुंबासोबत सुट्टीसाठी येथे जातो.
अक्षय कुमारचेही मुंबईच्या समुद्रकिनारी जुहू येथे भव्य घर आहे. या घराचे इंटीरियर अभिनेत्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने तयार केले आहे.
अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे हे सर्वांनाच माहीत आहे.त्याने टोरँटोजवळील संपूर्ण टेकडीसह देशभरात अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत.