सांगली : अंबाईवाडीच्या नशिबी पुन्हा पायपीटच; एसटीची चाचणी ठरली अयशस्वी | पुढारी

सांगली : अंबाईवाडीच्या नशिबी पुन्हा पायपीटच; एसटीची चाचणी ठरली अयशस्वी

वारणावती; आष्पाक आत्तार :  उखळूपैकी अंबाईवाडी व धनगरवाडा येथील 25 ते 30 विद्यार्थ्यांना दररोज शिक्षणासाठी शिराळा तालुक्यातील वारणावती येथे 11 ते 12 किलोमीटरची पायपीट करून यावे लागते. तितकेच अंतर परत जाताना होते. एका दिवसात या विद्यार्थ्यांना 20 ते 22 किलोमीटरचा खडतर रस्ता तुडवत शिक्षण घ्यावे लागते. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी या गावात अजून एसटी पोहोचली नाही, ही शोकांतिका आहे. त्याची झळ या विद्यार्थ्यांना बसत आहे.

ग्रामस्थ शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी वारंवार मागणी केल्यामुळे या मार्गावर खासदार राजू शेट्टी यांच्या प्रयत्नातून एसटी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची नुकतीच या मार्गावर चाचणी घेण्यात आली. मात्र तीव्र वळणे आणि अरुंद रस्ता असल्यामुळे एसटीला अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी यानंतर तत्काळ मुख्यमंत्री सडक योजनेचे मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या मार्गावरील तीव्र वळणे संबंधित ठेकेदाराला सूचना देवून दुरुस्त करून रस्ता कायमस्वरूपी वाहतुकीसाठी तयार करून देतो, असे आश्वासन दिले. त्यामुळे अजून किती दिवस या विद्यार्थ्यांना वीस ते बावीस किलोमीटरची खडतर पायपीट करून शिक्षण घ्यावे लागणार? आणि त्यांच्या नशिबी आलेला चालण्याचा वनवास संपणार, हे येणारा काळच ठरवेल.

आमच्या शाळेत जवळपास दहा किलोमीटर अंतर पार करून विद्यार्थी येतात. महामंडळाकडे आम्ही एस.टी.ची वारंवार मागणी केली होती. मात्र त्याला यश येत नव्हते.आता यश आले तर तीव्र वळण आणि अरुंद रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या नशिबी पुन्हा पायपीट आली आहे. परिवहन महामंडळाने एसटीऐवजी येथे मिनीबस चालू केली तर या विद्यार्थ्यांची पायपीट नक्कीच थांबेल.
सल्लाउद्दीन आत्तार- शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल, वारणावती

Back to top button