'गंगूबाई काठियावाडी' ऑस्कर नामांकनच्या शर्यतीत | पुढारी

'गंगूबाई काठियावाडी' ऑस्कर नामांकनच्या शर्यतीत

पुढारी ऑनलाईन: प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आहे. बॉलीवूडची स्टार अभिनेत्री आलिया भट्ट हिची मुख्य भूमिका असलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळेल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रिमियर झाले आहेत. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्फूर्त दाद मिळाली. नुसती दादच नाही, तर या चित्रपटाने परदेशी बाजारातही चांगली कमाई केली आहे. गंगूबाई काठियावाडी हा परदेशात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे.

संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट केवळ भारतातच नाही, तर परदेशातही कमाल करतात, असे समोर आले आहे. आतापर्यंतचे त्यांचे अनेक चित्रपट परदेशी प्रेक्षकांनाही आवडले आहेत. गेल्या दोन दशकांबद्दल बोलायचे तर, 2002 साली प्रदर्शित झालेला ‘देवदास’ हा चित्रपट ऑस्कर (Oscar) सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा चित्रपट होता.  ‘गंगूबाई काठियावाडी’ हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 10 वा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी खामोशी, हम दिल दे चुके सनम, देवदास, ब्लॅक, सावरिया, गुजारिश, राम लीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सारखे चित्रपट केले आहेत.

‘आरआरआर’, ‘द कश्मीर फाईल्स’ही चर्चेत

गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाशिवाय, राजमौली यांचा आरआरआर हा देखील ऑस्कर (Oscar) नामांकनासाठी पाठवला जाण्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. याचबरोबर विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकतो अशीही चर्चा आहे.

हेही वाचा:

 

Back to top button