‘एक नंबर बाप्पा’ म्हणत अभिनय बेर्डेचा धुमाकूळ | पुढारी

‘एक नंबर बाप्पा’ म्हणत अभिनय बेर्डेचा धुमाकूळ

पुढारी ऑनलाईन : कलेचा अधिपती गणपती, ऊर्जा आणि नवचैतन्य घेऊन येणारा गणेशोत्सव याचे प्रत्येकाच्या मनात एक खास स्थान असते. सध्या सगळ्यांनाच गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेत. सगळ्यांचा लाडका अभिनेता अभिनय बेर्डे सुद्धा त्याला अपवाद नाही. अभिनय बेर्डे ‘एक नंबर बाप्पा, नंबर वन फॅन’ असल्याचं सांगत बाप्पाच्या स्वागताच्या जल्लोषात तो सहभागी झाला आहे.

‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं पहिलंच धमाकेदार गाणं मराठीतला ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता अभिनय बेर्डेवर चित्रीत करण्यात आलं आहे. नितीन केणी यांच्या ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ’ची प्रस्तुती असलेला हा चित्रपट ४ नोव्हेंबरला चाहत्यांच्या भेटीला येत आहे. अभिनेता अभिनय बेर्डे, हिंदी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आणि ‘बिग बॉस १५’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही फ्रेश जोडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

आता जोरात वाजू द्या बाजा. येतोय सगळ्यांच्या दिलाचा राजा..! बाप्पा माझा एक नंबर… फॅन मी त्याचा एक नंबर… ! या गाण्यावर अभिनयचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. प्रत्येकाला थिरकायला लावेल अशा या गाण्याचे बोल आणि त्याचे संगीत या दोन्ही बाजू शोर यांनी सांभाळल्या आहेत. देव नेगी यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलं आहे. राहुल आणि संजीव यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

या गाण्याबद्दल बोलताना अभिनय सांगतो की, ‘बाप्पाचं आगमन’ सगळ्यांच आनंद देणार असतं. हाच आनंद आणि उत्साह तुम्हाला या गाण्यात पहायला मिळेल. मला स्वत:ला गणपतीच हे गाणं करताना खूप मजा आली. ‘बाप्पा’ हा सर्वांसाठीच नंबर वन’ असतो. यंदाच्या गणपतीत हे गाणं कल्ला करेल असा विश्वास त्याने व्यक्त केला.

या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट आर्टस प्रोड्क्शन, वेंकट अत्तीली आणि मृत्युंजय किचंबरे यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. निशिता केणी आणि करण कोंडे यांच्या ड्रगन वॉटर फिल्म्सने या चित्रपटाची सहनिर्मीती केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button