अमोल कोल्हेंचा ‘शिवप्रताप-गरुडझेप’ विजयादशमीच्या मुहूर्तावर रूपेरी पडद्यावर | पुढारी

अमोल कोल्हेंचा ‘शिवप्रताप-गरुडझेप' विजयादशमीच्या मुहूर्तावर रूपेरी पडद्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनीती आज संपूर्ण जगभर अभ्यासली जात आहे. महाराजांनी कशाप्रकारे शून्यातून स्वराज्य निर्मिती करत रयतेच्या राज्याची स्थापना केली याचे धडे जगभरातील सैनिकांना दिले जातात. इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये दडलेला हाच प्रेरणादायी अध्याय आता ‘शिवप्रताप – गरुडझेप’ या आगामी भव्य मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली असून, ५ ऑक्टोबर २०२२ या विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘शिवप्रताप – गरुडझेप’ चाहत्याच्या भेटीला येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सहिसलामत आग्राहून केलेली सुटका हा शिवकालीन इतिहासातील सुवर्ण अध्याय आहे. बादशहाला भेटायला जायचं आणि तिथून परत यायचं यामागं महाराजांचा राजकीय डावपेच होता मुत्सद्दीपणा याबाबत आजवर अनेक इतिहास तज्ज्ञांनी आपले विचार मांडले आहेत.

आग्य्राला जाण्याचं निश्चित करणं आणि तिथून माघारी येणं हा स्वराज्याच्या उभारणीतील महत्त्वाचा अध्याय आहे. यात राजांची विचारसरणी, तल्लख बुद्धीमत्ता, गनिमी कावा, प्रसंगावधान राखून आखलेली रणनीती, शत्रूला गाफील ठेवून रक्त न सांडता केलेला पराभव आदी गुण दिसतात. हा अध्याय आता ‘शिवप्रताप – गरुडझेप’ या चित्रपटाद्वारे डॅा. अमोल कोल्हे मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. अमोल कोल्हेंना आजवर सर्वांनीच मालिका, नाटक आणि महानाट्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना पाहिलं आहे. ‘शिवप्रताप – गरुडझेप’द्वारे त्यांनी प्रथमच मोठ्या पडद्यावर शिवराय साकारले आहेत.

शिवप्रताप - गरुडझेप
शिवप्रताप – गरुडझेप

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर, कार्तिक राजाराम केंढे यांची निर्मिती असलेल्या ‘शिवप्रताप – गरुडझेप’ या चित्रपटाचं दिग्दर्शन कार्तिक केंढे यांनी केलं आहे. प्रफुल्ल तावरे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. पटकथा डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांनी लिहिली असून, युवराज पाटील यांच्या साथीनं त्यांनी संवादलेखन केलं आहे. अमोल कोल्हेंसोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

छायाचित्रण संजय जाधव यांनी केलं असून, कला दिग्दर्शक महेश गुरुनाथ कुडाळकर यांचं आहे. पीटर गुंड्रा यांनी संकलन केलं असून, शशांक पोवार, रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं आहे. नृत्यदिग्दर्शन दिपाली विचारे यांनी केलं आहे. रवींद्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. इतिहासाच्या पुस्तकांतून अनुभवलेला आग्र्याहून सुटकेचा थरार येत्या विजयादशमीला शिवप्रताप-गरूडझेप मधून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button