

3 idiots sequel update shooting of 3 idiots sequel will start next year
मुंबई : बॉलिवूडच्या इतिहासातील एक माईलस्टोन चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या '3 इडियट्स' च्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. पडद्यावर 'रणछोडदास श्यामलदास चांचड' म्हणजेच 'रँचो' च्या भूमिकेत आमिर खानला (Aamir Khan) पुन्हा पाहण्याची संधी लवकरच मिळणार आहे. या आयकॉनिक चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सीक्वलची (3 इडियट्स 2) ची तयारी जोमात सुरू झाली असून, पुढील वर्षी त्याची शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.
राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि विधु विनोद चोप्रा यांच्या या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा गेल्या काही वर्षांपासून होती, पण आता ती प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे आहेत. मीडिया पोर्टल्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, '3 इडियट्स' (3 Idiots) ची मूळ कलाकारांची टीम या सीक्वलसाठी एकत्र येणार आहे. त्यामुळे आमिर खान आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालेल.
जवळपास 15 वर्षांपूर्वी ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही प्रचंड वाहवा मिळवली होती आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचे मोठे विक्रम केले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, '3 इडियट्स 2' ची स्क्रिप्ट आता लॉक झाली आहे आणि टीम याबद्दल खूप उत्साहित आहे. एका विश्वसनीय सूत्राने 'पिंकविला'ला सांगितले, ‘टीमचा विश्वास आहे की पहिल्या भागाची जादू पुन्हा येणार आहे. हा सीक्वलही पहिल्या भागाप्रमाणेच मजेदार, भावनिक आणि अर्थपूर्ण असेल.’
चित्रपटाच्या कथानकाचे काही तपशील समोर आले आहेत. '3 इडियट्स 2' मध्ये, चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये पात्रे वेगळी झाल्यानंतर आणि एका नवीन साहसासाठी पुन्हा भेटल्यानंतर सुमारे 15 वर्षांनंतरची कथा दाखवली जाईल. अनेक दिवसांपासून '3 इडियट्स' च्या सीक्वलवर काम करण्याचा विचार करणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना आता ही लोकप्रिय फ्रँचायझी पुन्हा पडद्यावर आणण्याची योग्य संधी वाटत आहे.
राजकुमार हिरानी यांनी '3 इडियट्स' च्या सीक्वलसाठी एक दमदार स्क्रीनप्ले लिहिण्यात खूप वेळ दिला आहे. त्यांच्या मनात नेहमीच '3 इडियट्स 2' साठी एक कल्पना होती, परंतु ती परिपूर्ण असावी आणि मूळ चित्रपटाचा वारसा कायम राखणारी असावी, अशी त्यांची इच्छा होती.
2009 मध्ये रिलीज झालेला 'थ्री इडियट्स' हा बॉलिवूडमधील सर्वात आयकॉनिक आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या सीक्वलबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण रीयूनियनच्या या बातमीने सोशल मीडियावर चर्चांना आधीच उधाण आणले आहे.
दरम्यान, अशीही माहिती मिळत आहे की राजकुमार हिरानी आणि आमिर खान यांनी एकत्र काम करत असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या बायोपिक वरचे काम सध्या थांबवले आहे. याचे कारण म्हणजे, दोघेही या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर पूर्णपणे समाधानी नव्हते. यामुळे, आता या दोघांनी आपले लक्ष '3 इडियट्स 2' कडे वळवले आहे, असे दिसते.
'3 इडियट्स' च्या 'ऑल इज वेल' म्हणणाऱ्या रँचोच्या परत येण्याची बातमी निश्चितच चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.