रक्षाबंधन : पल्लवी पाटील, धनश्री कडगावकरने व्यक्त केल्या भावाबद्दलच्या भावना | पुढारी

रक्षाबंधन : पल्लवी पाटील, धनश्री कडगावकरने व्यक्त केल्या भावाबद्दलच्या भावना

पुढारी ऑनलाईन डेस्क : राखी पोर्णिमा हा सण भाऊ बहिणी मधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. छोट्या पडद्यावरील नवीन मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब-चौधरी, पल्लवी पाटील आणि धनश्री कडगावकर यांनी आपल्या भावा बरोबरच्या अतुट नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. पल्लवी पाटील “नवा गडी नवं राज्य” मधील आनंदी आपल्या भावा बरोबर असलेल्या प्रेमळ नात्या बद्दल सांगते की, “मी माझाच भाऊ नाही तर चुलत भावांना देखील तेवढ्याच प्रेमाने राखी बांधते. आम्ही सर्व एकत्र जमलो की धम्माल करतो. लहान असताना आपल्याला कोणीतरी राखी बांधून दादा म्हणावं असे वाटायचे ती इच्छा मग माझ्या बहिणी मला राखी बांधून दादा म्हणून पूर्ण करायच्या. ही माझी बालपणीची आठवण अजूनही माझ्या स्मरणात आहे. आम्हा भावंडांच नातं खूप गोड आहे.”

अभिनेत्री दिपा परब-चौधरी ही बऱ्याच कालावधीनंतर “तू चाल पुढं” या नव्या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहे. दिपा आपल्या भावाबद्दल सांगते की, आमचे नाते खूप गोड आहे. तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. माझा भाऊ मला नेहमी माझ्या कामासाठी प्रोत्साहन देतो. माझे काम त्याला खूप आवडते. नवीन नवीन गोष्टी तो मला सुचवतो. यावर्षी देखील तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने आम्ही रक्षाबंधन साजरे करणार आहोत, असं सांगताना दिपा खूप खुश होती.

“तू चाल पुढं ” या नवीन मालिकेतील” शिल्पी” या भूमिकेत दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर लहानपणीच्या आठवणी सांगताना म्हणाली की, आम्ही लहानपणी खूप भांडायचो. भन्नाट मस्ती करायचो. पण ते तेवढ्यापुरतेच. लहानपणी रक्षाबंधनाला भावाकडे मला देण्यासाठी छानशी भेट वस्तू असायची. पण मला मुद्दाम चिडवण्यासाठी एक रुपया द्यायचा. अशा मधूर आठवणी आहेत. या वर्षी कामात व्यस्त असल्यामुळे भेट होईल की नाही शंका आहे. पण आम्ही नक्की रक्षाबंधन साजरे करु.

Back to top button