गोव्यातील प्रसिद्ध तियात्र कलाकार सेल्वी यांचे निधन | पुढारी

गोव्यातील प्रसिद्ध तियात्र कलाकार सेल्वी यांचे निधन

मडगाव : पुढारी वृत्तसेवा : कोंकणी तियात्र रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते व वेळ्ळी येथील तियात्र कलाकार मॅथ्यू कुरय्या उर्फ कॉमेडियन सेल्वी यांचे सोमवारी सकाळी गोमेकॉत निधन झाले. सेल्वी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून गोमेकॉत (गोवा वैद्यकीय महाविद्यालय, इस्पितळ) उपचार सुरू होते. त्यांच्या अचानक जाण्याने तियात्र रंगभूमीला मोठा धक्का बसला आहे.

मडगाव येथे ‘आठ दिस’ या तियात्रात भूमिका सादर करताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नेले. तब्येत जास्तच खालावल्याने त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी (दि.२६) रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. तियात्र या लोकनाट्य प्रकारातून त्यांनी अभिनयाला सुरवात केली होती. विनोदी भूमिका हे त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य होते. निर्माता दिग्दर्शकानी यांनी त्यांना रंगभूमीवर दिलेल्या संधीचे त्यांनी सोने केलं होतं.

सध्या ते नावेली येथे कोमेडियन अगोस्टीन यांच्या तियात्रमध्ये काम करीत होते. त्यांनी सुमारे २०० व्हिडिओ चित्रफितीमध्ये अभिनय केला आहे. २५ चित्रफितीमध्ये त्यांनी कोकणी गीते गायलेली आहेत. शेजारी, सेकंड हँड, गार्बेज, बेकार लवडी व रोंग नंबर अशा पाच व्हिडिओची त्यांनी स्वतः निर्मिती केली आहे. अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी लंडन, पेरिस, कुवेट, दुबई, मस्कत, दोहा कतार, बहरिन येथील रसिकांना रिजवले आहे. त्यांना विनोदी कलाकारांच्या अभिनयासाठी ‘गुलाब व जॅक दि सिक्वेरा’ या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

कोमेडियन सेल्वी यांच्या निधनाची माहिती मिळताच समाज माध्यमावर त्यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. जिवंतपणी त्यांनी जगाला खळखळून हसवले आणि आता दुःख देऊन गेला अशी प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली आहे. सेल्वी यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला होता. अखेरच्यावेळी ते फक्त ४८ वर्षाचे होते. ते तियात्र कलाकाराबरोबर उत्तम गायक, लेखक, डायरेक्टर व प्रोड्युसरही होते. त्यांच्या अचानक जाण्याने कोंकणी क्षेत्रात तसेच तियात्र क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची चर्चा लोकांमध्ये पसरली आहे. मुख्यमंत्र्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button