पिंपरी : विक्रेत्यांची बायोमेट्रिक नोंदणी सुरू; महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतून सर्वेक्षण | पुढारी

पिंपरी : विक्रेत्यांची बायोमेट्रिक नोंदणी सुरू; महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतून सर्वेक्षण

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने पथारीवाले, हातगाडी, टपरीधारकांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणास सोमवारी (दि. 25) सुरुवात झाली. त्याला विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेने सन 2012 व 2014 ला शहरातील विक्रेत्यांचे सर्वेक्षण केले. त्यात 9 हजार 25 फेरीवाल्यांची नोंद झाली. त्यातील सुमारे 5 हजार विक्रेत्यांची बायोमेट्रिक नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. उर्वरित 4 हजार विक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षणास पालिकेने सोमवारपासून सुरुवात केली आहे.

पूर्वी झालेल्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या विक्रेत्यांची बायोमेट्रिक नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे बंधनकारक आहेत. नवीन विक्रेत्यांची नोंदणी केली जाणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिकेने सर्वेक्षण अर्धवट सोडून दिल्याने महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे काशिनाथ नखाते यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सहा आठवड्यात बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षण झालेल्या जुन्या विक्रेत्यांसाठी ही शेवटची संधी आहे. नवीन विक्रेत्यांसाठी हे सर्वेक्षण नाही, असे नखाते यांनी सांगितले.

Back to top button