‘बनी’ चित्रपटाचा देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये समावेश | पुढारी

'बनी' चित्रपटाचा देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये समावेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बनी’ या चित्रपटाचा फर्स्टलूक ‘७५व्या ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान ‘इंडिया पॅव्हेलियन’मध्ये रिलीज करण्यात आला. निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित – दिग्दर्शित हा चित्रपट आहे. ‘बनी’ चित्रपटाचा देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी ढाका येथील प्रसिद्ध ‘सिनेमेकिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ निवड झाल्यानंतर स्पेन येथील जगप्रसिद्ध ‘माद्रिद’ आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी या चित्रपटाची निवड झाली. त्यापाठोपाठ अमेरिकेतील ‘फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आणि नुकतेच जाहीर झालेल्या ‘के आसिफ’, ‘अयोध्या’, ‘गंधार इंडिपेंडेंट’ चित्रपट महोत्सवासाठी ‘बनी’ची निवड झालीय.

विवेक नावाच्या व्यक्तीने १० वर्षाच्या बनीला जगापासून दूर, अलिप्त ठेवले आहे. असे करण्यामागे त्याचे स्वत:चे अनेक तर्क आणि कारणे आहेत. कालांतराने बनी जगाकडे विवेकच्या नजरेतून बघू लागते. तो जे सांगेल त्याला ती खरे मानू लागते. परंतु त्याचवेळी बनीचे स्वत:चेही विश्व तयार होत आहे. आणि कालांतराने विवेक आणि बनीचा हा प्रवास एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचतो. बनी हा चित्रपट सामाजिक-मानसिक थरारपट असून आजच्या ज्वलंत सामाजिक विषयासंबंधित आहे.

अनेक यशस्वी चित्रपटांच्या कार्यकारी निर्मितीची धुरा सांभाळणाऱ्या शंकर धुरी यांचे निर्माता म्हणून हे प्रथम पदार्पण आहे. नवोदित दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांच्या सृजनशील विचारांनी अत्यंत वेगळ्या धाटणीचा विषय मांडण्यात आला आहे. दिग्दर्शकाच्या मनातील हे तरल भावोत्कट नाट्य सिनेमॅटिकचे कसब डीओपी कार्तिक काटकरने लीलया पेललं आहे.

बनीच्या शीर्षक भूमिकेत बालकलाकार सान्वी राजेने अभिनय साकारला आहे. शैलेश कोरडे व शीतल गायकवाड या कलाकारांनी प्रमुख भूमिका निभावली आहे. आकर्षक कलादिग्दर्शन अनिल वाठ यांनी केलं आहे. सुस्पष्ट साऊंड डिझाईन अभिजीत श्रीराम देव यांचे आहे. संकलन योगेश भट्ट याचं आहे. पार्श्वसंगीत अक्षय एल्युरीपटी यांनी दिलं आहे. स्थिरचित्रण निखील नागझरकर यांनी केले आहे. सहाय्यक दिग्दर्शन विशाल पाटील, सुनील जाधव याचं आहे.

Back to top button