Shabaash Mithu : तापसी पन्नूच्या ‘शाबाश मिट्ठू’चा ट्रेलर रिलीज (Video) | पुढारी

Shabaash Mithu : तापसी पन्नूच्या 'शाबाश मिट्ठू'चा ट्रेलर रिलीज (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तापसी पन्नू चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी लवकरच भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Shabaash Mithu) चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मितालीचा बालपणापासून क्रिकेटर होण्यापर्यंतचा प्रवास उत्तम प्रकारे दाखवण्यात आला आहे. (Shabaash Mithu)

चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होणार

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मिताली लहानपणी क्रिकेट खेळण्यात पारंगत असल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रशिक्षक तिच्या पालकांना सांगतो की, तिला योग्य प्रशिक्षण दिले तर ती राष्ट्रीय पातळीवर खेळू शकते. यानंतर त्यांचे प्रशिक्षण आणि संघर्ष सुरू होतो. तापसी पन्नूचा हा चित्रपट २५ जुलैला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. तापसी पन्नूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट शाबाश मिट्ठूच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. आठ वर्षांची मुलगी होण्यापासून ते क्रिकेट लिजेंडपर्यंतचा तिचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

कोण आहे मिताली राज?

मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू आहे. तिने आपल्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग ७ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. चार वर्ल्डकपमध्ये तिने भारताचे नेतृत्व केले आहे. मिताली राजने नुकतीच सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. ३९ वर्षीय मितालीने २३ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आणि अनेक मोठे यश संपादन केले. अलीकडेच तिने न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

Back to top button