Sonu Sood Brithday : ‘हा’ खलनायक नव्हे, तर सामान्यांचा नायक !!! | पुढारी

Sonu Sood Brithday : 'हा' खलनायक नव्हे, तर सामान्यांचा नायक !!!

अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन : आज प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदचा (Sonu Sood Brithday) वाढदिवस आहे. तो सामान्यांचा मसिहा कसा ठरला? तर, दीड वर्षांपूर्वी कोरोनाने भारतात शिरकाव केला. कसलीच कल्पना नसताना आलेलं संकट पाहून सरकारने टाळेबंदी जाहीर झाली अन् मुंबईतील स्थलांतरित मजुरांच्या हातचं कामच गेलं. सगळीकडे शुकशुकाट. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत आपलं गाव गाठलेलं बरं, म्हणून जो-तो आपलं घर जवळ करण्याचा प्रयत्न करू लागला. 

टाळेबंदीमुळे प्रवासी गाड्या बंद, रेल्वे बंद. गावाकडे जाणार कसं? मग, जो तो आपल्या बिऱ्हाडाला सोबत घेऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करू लागला होता. कोण रानावनातून चालंत होता. तर, कोण रेल्वेच्या पटरीवरून पळत होता. कोण पॅन्डल जोरात मारत सायकल पळवत होता तर, कोण आपल्या मुलांबाळांना खांद्यावर, काखेत घेऊन मुंगीच्या पावलाने घर जवळ करण्याचा प्रयत्न करत होता. 

सोनू सूद

मुंबईतील ही परिस्थिती इतकी करुणाजनक होती. आई-बापांचे चालून चालून थकलेले पाय अन् खांद्यावर बसलेल्या लहानग्यांचा सुकलेला चेहरा पाहून परप्रांतीय हा शब्द कुठल्या कुठं विरून गेला होता. फक्त माणुसकी दिसत होती. जो-तो आपल्या घरात जे काही खायंचे पदार्थ असतील, तो आणून या वाटसरुंना देत होता. जमेल तशी मदत करण्यासाठी पुढे येत होता. ही परिस्थिती पाहून या स्थलांतरितांना आपल्या घरी सुरक्षित पोहोचविण्यासाठी चित्रपटांतील खलनायक असणारा सोनू सूद नायक म्हणून धावून आला.

मुंबईत अडकलेल्या स्थलांतरितांना घरी पोहोचविणं आपलंही कर्तव्य आहे, अशा सामाजिक भावनेतून सोनू सूदने पदरच्या खर्चातून मजुरांना घरी पोहोचविण्यासाठी बसेस आणि त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली होती. अनेक चित्रपटांमधून खलनायकाची भूमिका निभाविणारा सोनू सूद प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मजुरांना घरी पाठविण्याची व्यवस्था करताना दिसला होता. 

सोनू सूद आणि त्याची टीम अडकलेल्या हजारो स्थलांतरितांना घरी पोहोचविण्यासाठी शेकडो बसेसची सोय, इतकंच नव्हे तर त्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी त्यांच्या खाण्यापिण्याची सोयदेखील करताना माध्यमांमधून दिसून आली होती. सोनू सूदचे मदतकार्य पाहून अनेक लोकांनी सोनू सूदकडे त्याच्या ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर तत्सम समाजमाध्यमांवरून घरी पोहोचविण्याची मदत मागताना दिसून आले.

सानू सूद

‘अडचणीत सापडलेल्या भक्तांच्या मदतीला धावून आलेला परमेश्वर’, अशी प्रतिमा घरी सुरक्षित पोहोचलेल्या मजुरांच्या मनात निर्माण झालेली होती. ‘बिहारच्या सिवान जिल्ह्यातील लोक सोनू सूद यांचा पुतळा उभा करण्याच्या तयारीत होते’, त्यावेळी सोनू सूद म्हणाला की, “माझ्या पुतळ्यासाठी खर्च करण्यापेक्षा गरिबांच्या मदतीसाठी ते पैसे वापरा”, हे प्रतिट्वीट पाहता, पडद्यावरचा खलनायकच गरिबांच्या आयुष्यातील खरा नायक ठरला. 

मजूर त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचत नाहीत तोपर्यंत हे मदतकार्य सुरुच राहणार आहे, असे सांगून मजुरांना मदत हवी असेल तर नि:संकोचपणे माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन करत सोनू सूदने व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि टोल फ्री नंबर समाजमाध्यमांमधून शेअर केला होता. नाव, नंबर आणि पत्ता पाठवून द्या. माझी टीम तुमच्याशी त्वरित संपर्क साधेल, असे आवाहनदेखील केले होते. 

त्यामुळे अडकलेल्या प्रत्येक मजुराच्या मनात घरी पोहोचण्याची आशा निर्माण झाली होती. त्याने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो व्हॉट्सअ‍ॅप मेसेजस, कॉल्स येऊ लागले. त्यातून शेकडो गाड्यांची व्यवस्था केली जाऊ लागली. अन्नाचे पॅकेट्स वाटले जाऊ लागले. झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान अशा अनेक राज्यांतील स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचविण्याची व्यवस्था सोनू सूदची टीम रात्रंदिवस धडपडू लागली. 

हे सगळं करत असताना सोनू सूद विनयशील म्हणाला की, “मला शेकडो मेसेजस आणि कॉल्स येत होते.  दिवस-रात्र मी आणि माझी टीम स्थलांतरितांना घरी पोहोचविण्यासाठी काम करीत होतो. मला असं वाटतं की, टाळेबंदीच्या काळात आमंच कामही बंद होतं. त्या काळात स्थलांतरितांना पोहोचवणं, हेच माझं काम झालं होतं. या कामामुळे एक मानसिक समाधान मिळत होतं.” मोठ्या पडद्यावर खुंखार, प्रचंड रागिष्ट, आपल्या पिळदार शरीरयष्टीने नायकालाही पाणी पाजणारा हा खलनायक, वास्तव जगण्यात नायक ठरलेला होता. 

सोनू सूद

करोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आणि या काळात आपल्या जिवाची कोणतीही पर्वा न करता दिवसरात्र सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासाठी सोनू सूदने मुंबईतील स्वत:चे हॉटेल उपलब्ध करून दिले होते. या विधायक कामामुळे समाजमाध्यमांतून सोनू सूदवर आजही कौतुकांचा वर्षांव होत आहे. बॉलिवुडमधील अनेक कलाकारांनी सोनू सूदचे कौतुक केलेले होते. 

खरं तर कोरोना आणि टाळेबंदीच्या काळात निर्माण झालेल्या अनेक सकारात्मक-नकारात्मक घटनांवर भविष्यात चित्रपट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात सलमान खानपासून सोनू सूदपर्यंत सर्वांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाची दखल घेऊन अनेक सिनेमे येऊ शकतात. तूर्तास अशा शक्यतांमध्ये सोनू सूद आघाडीवर आहे. 

कारण, दिग्दर्शक संजय गुप्ता आणि सोनू सूदच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचा स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवरून व्हायरल झाला होता. त्यात सोनू सूद यांच्यावर चित्रपट करण्याची तयारी दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी दर्शविली होती. इतकंच नव्हे तर या चित्रपटात सोनू सूदची भूमिका अक्षय कुमार करणार असल्याची चर्चादेखील गुप्तांनी केलेली होती. पाहू हा चित्रपट येतो की नाही. पण, एक मात्र खरं आहे की, चित्रपटाच्या पलिकडे सोनू सूदचं काम गेलेलं आहे. 

चित्रपटातील खलनायक सोनू सूद रस्त्यावर उतरून मजुरांच्या खाण्या-पिण्यापासून त्यांना घरी सुरक्षित पोहोचविण्यापर्यंत काम करताना दिसत होता. त्याच्या बरोबरीने आपणही हे विधायक कार्य हाती घ्यावं, हा विचार सोडून त्याच्या मदतकार्यावर राजकारण करताना राज्यकर्ते दिसले होते. हे राजकारण असं… त्यावेळी काॅंग्रेस म्हणाली होती की, “आम्हाला परवानगी द्या. आम्ही बसेसची सोय उपलब्ध करून रस्त्याने चालत जाणाऱ्या मजुरांना घरी सुरक्षित पोहोचवितो”, अशी मागणी काँग्रेसने योगी सरकारकडे केलेली होती. 

सोनू सूद

पण झालं काय? तर, त्याच्यामध्ये योगी सरकारने स्थलांतरितांच्या प्रवासाविषयीचं गांभीर्य विसरून काँग्रेसच्या या विधायक मागणीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करून अडचणी निर्माण केल्या होत्या. अशा वातावरणात सोनू सूद स्थलांतरितांसाठी बसेस उपलब्ध करून मजुरांना घरी पोहोचविण्याचं काम करू लागला होता. 

हाच मुद्दा लक्षात घेत काँग्रेसने योगी सरकारवर निशाणा साधला होता की, “बरं झालं सोनू सूद महाराष्ट्रात आहे. तेथून तो मजुरांना घरी पोहोचविण्याचे चांगलं काम करत आहेत. सोनू सूदने उत्तर प्रदेशमध्ये हेच कार्य करायला घेतले असते तर योगी सरकारने पहिल्यांदा सोनू सूदच्या बसेसना स्कूटर संबोधले असते, नंतर त्याच्या आरोग्यावर शंका उपस्थित केली असती, त्यानंतर त्याला सरळ कारावासात पाठविले असते”, अशी टीका काॅंग्रेसने केली. 

मूळात कोरोनाच्या या महामारीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून जे राजकारण केलं गेलं, ते चुकीचं होतं. करोनाचा विषाणू कोणताही भेदभाव न करता समाजाच्या सर्व स्तरांमध्ये दिवसेंदिवस आपले हातपाय पसरत होता आणि पसरतो आहे. अशा परिस्थितीत एकमेकांना मदतीचा हात देत सर्वांनी कोरोना संकटाला तोंड दिलं पाहिजे. 

सोनू सूद
Sonu Sood Brithday : ‘हा’ खलनायक नव्हे, तर सामान्यांचा नायक !!!

…अशी घेतली लोकांनी सोनू सूदच्या कामाची दखल 

सोनू सूदचा आज वाढदिवस (Sonu Sood Brithday) आहे. त्याने केलेल्या कामाची दखल घेऊन लोकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. ते प्रेम नेमकं कोणत्या स्वरूपात होत्या, ते पाहू. ‘फोर्ब्स’कडून ‘लिडरशीप अवाॅर्ड २०२१’ हा पुरस्कार जाहीर झाला. विशेष म्हणजे त्याला हा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती नव्हती. त्याच्याच एका चाहत्याने सोशल मीडियावरून त्याला बी माहिती दिली. सोनू सूदवर एक पुस्तकही लिहिले गेले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘आई एम नो मसीहा’. त्याच्या पुस्तकाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पंजाबमधील टाऊन मोगा रस्त्याचे नाव सोनू सूदच्या स्वर्गीय आईचे नाव सरोज सूद असे देण्यात आले आहे. त्यावेळी सोशल मीडियावर सोनूने भावनिक पोस्ट लिहिले होती की, “यह है… और यह होगा… मेरी अब तक की सबसे बड़ी उपलब्धि. मेरी मां के नाम पर मोगा में एक सड़क… ‘प्रो. सरोज सूद रोड’ मेरी सफलता का सही मार्ग. मिस यूं मां.”

सोनू सूद

तो पुढे असंही लिहितो की, “एक दृश्य जो मैंने अपने जीवन में सपना देखा था. आज मेरे होम टाउन मोगा में एक सड़क का नाम मेरी मां के नाम पर रखा गया है. ‘प्रो.सरोज सूद रोड’. ये वहीं सड़क है जिस पर उन्होंने सारी जिंदगी यात्रा की. घर से कॉलेज और फिर घर वापस. यह हमेशा मेरे जीवन का सबसे महत्वपूर्ण अध्याय होगा. मुझे यकीन है कि मेरे मम्मी और पापा स्वर्ग से कहीं न कहीं मुस्कुरा रहे होंगे. काश वे इसे देखने के लिए आसपास होते.”

करोना आणि टाळेबंदीच्या काळात अनेक स्थलांतरीच्या संकटात देवासारखा धावून येणारा अभिनेता सोनू सूद हा आता काही परमेश्वरापेक्षा कमी नव्हताच. त्यामुळेच तेलंगणाच्या डुब्बा टांडा गावातील नागरिकांनी सिद्दीपेट जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सोनू सूदचे चक्क मंदीर उभे केले आहे. नुकतेच या मंदिरात सोनू सूदच्या मुर्तीच्या अनावरण करण्यात आले आहे. याप्रसंगी गावातील महिलांनी सोनू सूदच्या मुर्तीच्या अनावरणाप्रसंगी पारंपरिक वेशभूषेसह लोकगीतं गायली होती.

इतकंच नाही, तर स्पाईज जेट नावाच्या विमान कंपनीनं सोनू सूदच्या कामाची दखल घेऊन वेगळ्या पद्धतीने त्याला सलाम केला. केलं काय, तर या विमान कंपनीनं बोईंग-७३७ या विमानावर सोनू सूदचं भलंंमोठं छायाचित्र चिकटवलं. त्यावर लिहिलं ‘मसिहा सोनू सूद को सलाम!’, अशा पडद्यावरील खलनायकाचा (Sonu Sood Brithday) वाढदिवस आहे. पण, हा खलनायक नाहीच तर वास्तव जगातील नायक ठरला आहे. 

पहा व्हिडीओ : समांतर-२ कुमारची बायको निमाचा रोल नेमका काय आहे?

Back to top button