वॉशिंग्टन ः डायनासोर लघुग्रहाच्या धडकेनंतरच्या त्सुनामीत नष्ट झाले. एके काळी पृथ्वीवर डायनासोरच्या विविध प्रजातींचेच साम—ाज्य होते. त्यापैकी अनेक डायनासोर महाकाय होते. असे जीव कोट्यवधी वर्षांपूर्वी कसे नष्ट झाले हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.
एका लघुग्रहाच्या धडकेने ते नष्ट झाले असे मानले जाते. मात्र, या धडकेपूर्वीही त्यांचा र्हास होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती असेही म्हटले जाते.
आता संशोधकांनी म्हटले आहे की 6.6 कोटी वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेत हा विशाल लघुग्रह पृथ्वीला धडकला होता. त्यामुळे समुद्रात एक मैल किंवा सुमारे 1600 मीटर उंचीच्या त्सुनामीच्या लाटा उसळल्या होत्या. या त्सुनामीत अडकून डायनासोर नष्ट झाले.
लुइसियाना युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी लाटांच्या वाळूच्या अवशेषांवरून याबाबतचे संशोधन केले आहे. या सागरी लाटांच्या खुणा लुइसियानाच्या सागरी तटाच्या जमिनीत गाडलेल्या आहेत. संशोधकांनी भूकंपीय तपासणीच्या माध्यमातून ही नवी माहिती समोर आणली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून लघुग्रहाच्या धडकेने निर्माण झालेल्या महाविनाशाचे पुरावे शोधले जात आहेत. हा लघुग्रह मेक्सिकोच्या यूकाटन बेटावर धडकला होता. या धडकेनंतर त्सुनामीच्या लाटा जगभर फैलावल्या होत्या. संपूर्ण पृथ्वी त्यावेळी धुळीच्या ढगाने आच्छादीत झाली होती.
अमेरिकन संशोधकांनी तेल खननासाठी काम करणार्या कंपनीच्या मदतीने जमिनीत 5 हजार फूट खोलीवरील स्तर पाहिला. ही माती त्यावेळेची आहे ज्यावेळी पृथ्वीला लघुग्रह धडकला होता. त्यावेळी सुमारे 1600 मीटर उंच उसळलेल्या त्सुनामीच्या खुणाही मिळाल्या. धडकेनंतर पाण्यात दोनशे फूट खोलवर हालचाल निर्माण झाली होती व या लाटा किनार्यावर येऊन धडकल्या. त्यामुळे डायनासोरसह अन्यही अनेक जीव नष्ट होऊन गेले.