‘पाकीजा’वर वेबसीरिज | पुढारी

‘पाकीजा’वर वेबसीरिज

पुढारी ऑनलाईन

सन 1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या ‘पाकीजा’ या चित्रपटाचे अनेक चाहते आहेत. कमाल अमरोही यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता या चित्रपटाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कमाल अमरोही यांचा नातू अभिनेता आणि निर्माता बिलाल अमरोही यांनी ‘पाकीजा’ नावाच्या वेबसीरिजची घोषणा केली आहे. मूळ चित्रपटात मीनाकुमारींनी एका गणिकेची भूमिका साकारली होती. चित्रपटात राजकुमार आणि अशोककुमार यांच्याही भूमिका होत्या. 1956 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते आणि 16 वर्षांनंतर तो प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एकाच महिन्यात कुणाच्या ध्यानीमनी नसताना मीनाकुमारी यांचा वयाच्या 39 च्या वर्षी लिव्हर सायरोसिसमुळे मृत्यू झाला. त्यानंतर चित्रपटाला प्रचंड यश लाभले. आता बिलाल अमरोही हे ‘पाकीजा’ या सीरिजमधून मीनाकुमारी आणि कमाल अमरोही यांच्यातील प्रेमकहाणी घेऊन येत आहेत. तसेच यात ‘पाकीजा’ चित्रपटाला पूर्ण होण्यास लागलेल्या 16 वर्षांच्या कालावधीतील अनेक घडामोडीदेखील असणार आहेत. पुढील वर्षी या सीरिजचे शूटिंग सुरू होईल.

Back to top button