दीपिकाच्या चित्रपटाला कचरा म्हणाली कंगना | पुढारी

दीपिकाच्या चित्रपटाला कचरा म्हणाली कंगना

पुढारी ऑनलाईन

कुणी प्रतिक्रिया विचारो अथवा न विचारो प्रत्येक मुद्द्यावर व्यक्‍त होणारी बॉलीवूडची ‘पंगा क्‍वीन’ कंगना राणावतने आता अभिनेत्री दीपिका पदुकोनवर निशाणा साधला आहे. दीपिकाचा चित्रपट ‘गहराईयाँ’ नुकताच अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट न पाहताच कंगनाने त्याला कचरा असे म्हटले आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘हिमालय की गोद में’ या जुन्या चित्रपटातील मनोजकुमार-माला सिन्हा यांच्यावर अभिनीत ‘चाँद सी मेहबूबा…’ हे गाणे शेअर केले आहे. त्यासोबत कंगनाने लिहिले आहे की, मीदेखील इतरांप्रमाणेच आहे. पण मला रोमान्स कळतो. नवे युग, मॉडर्न चित्रपट या नावाखाली कृपया आम्हाला कचरा विकू नका. वाईट चित्रपट वाईटच असतात. अंगप्रदर्शन आणि पोर्नोग्राफी अशा चित्रपटांना वाचवू शकत नाही. बेसिक हेच आहे की, यात काहीही ‘गहराईयाँ’ नाही. कंगनाने या चित्रपटातील दीपिका आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यातील इंटिमेट द‍ृश्यांवरून असा निशाणा साधला आहे. यापूर्वीही कंगनाने दीपिकाच्या डिप्रेशन आणि मानसिक आरोग्यविषयक एनजीओवरूनही तिला ट्रोल केले होते.

दीपिकाच्या चित्रपटाला कचरा म्हणाली कंगनादरम्यान, सध्या कंगना एकता कपूरने निर्माण केलेला ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एक रिअ‍ॅलिटी शो होस्ट करणार आहे. त्यामुळेही ती वादग्रस्त बोलून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. बिग बॉस प्रमाणेच हा शो असणार आहे, असे दिसते पण ‘ये भाई का घर नहीं’ अशी कॉमेंट या शोच्या लाँचिंगवेळी केली होती. तथापि, ‘बिग बॉस’च्या घरात एकेकाळी राहून गेलेले चेहरेच कंगनाच्या शोमध्ये दिसणार आहेत.

Back to top button