सोयरीक चित्रपटाचा शानदार प्रीमियर | पुढारी

सोयरीक चित्रपटाचा शानदार प्रीमियर

पुढारी ऑनलाईन डेस्क

चित्रपटाच्या घोषणेपासून उत्सुकता निर्माण करणाऱ्या सोयरीक या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चित्रपटातील कलाकारांसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी या प्रिमियर सोहळ्याला हजेरी लावली. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेल्या सोयरीक चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले आहे. विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने या चित्रपटाचे निर्माते आहेत.

महत्त्वाचा विषय आणि त्यातील मानसिक संघर्ष शेवटपर्यंत उत्तम पद्धतीने मांडला असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितीत मान्यवरांनी यावेळी दिल्या. ही सोयरीक मनाला अंत:र्मुख करणारी आहे अशा शब्दात उपस्थितीत मान्यवरांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. ‘सोयरीक’ किंवा ‘लग्न जुळवणे’ ही कुटुंब प्रवाहाला वळण देणारी घटना असते. लग्नाविषयी, त्यापेक्षाही सहजीवनाविषयी आजची तरुणाई जास्त प्रॅक्टिकली विचार करतेय. पण, या व्यावहारिकतेमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य किती जपलं जातंय, एकमेकांच्या अपेक्षांचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याएवढी परिपक्वता खरंच आली आहे का? हे प्रभावीपणे दाखवून देणारा हा चित्रपट आहे.

‘सोयरीक’ चित्रपटात शशांक शेंडे, किशोर कदम, छाया कदम, उमेश जगताप, राजश्री निकम, शंतनू गंगणे, विराट मडके, प्रियदर्शनी इंदलकर, विनम्र भाबल, निता शेंडे, योगेश निकम, अतुल कासवा, संजीवकुमार पाटील, अपर्णा क्षेमकल्याणी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

Back to top button