”तो एकटा लढला आणि जिंकूनही आला…!”, अभिनेत्री अश्विनी महांगडे यांची रोहित पाटलांसाठी खास पोस्ट | पुढारी

''तो एकटा लढला आणि जिंकूनही आला…!'', अभिनेत्री अश्विनी महांगडे यांची रोहित पाटलांसाठी खास पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क

राज्याचेही लक्ष लागलेल्या आणि नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १० जागा जिंकत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. या निवडणुकीत आर आर पाटील यांच्या रोहित पाटील (Rohit Patil) यांनी नगरपंचायतीचं एकहाती मैदान मारलं. निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला होता. आरपीआय व भाजप यांनीही उमेदवार उभे केल्याने चुरस होती. मात्र राष्ट्रवादीने एकहाती सत्ता घेतली. आमदार सुमनताई पाटील, युवा नेते रोहित पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. या विजयानंतर रोहित पाटील यांचे राज्यभरातून अभिनंदन केले जात आहे. विशेष म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत रोहित यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

”तो एकटा लढला आणि जिंकूनही आला…! २३ वर्षाच्या तरुणाने आपले संस्कार जपत संयमाने विरोधकांशी लढाई जिंकून युवापीढीसमोर एक आदर्श घालून दिला.” असे अश्विनी महांगडे यांनी म्हटले आहे.

काय म्हटलंय पोस्टमध्ये…

”तो एकटा लढला आणि जिंकूनही आला…! २३ वर्षाच्या तरुणाने आपले संस्कार जपत संयमाने विरोधकांशी लढाई जिंकून युवापीढीसमोर एक आदर्श घालून दिला.

जेव्हा रक्तातचं जिंकण्याची धमक असते तेव्हा हरविण्यासाठी कितीही षडयंत्र रचले गेले तरी त्याला भेदून पार करणे आणि विरोधकांना आपल्या ताकदीचा परिचय करून देणे आवश्यक असते.

आमचे बंधूतूल्य एक संस्कारी व संयमी युवानेतृत्व मा. रोहीत दादा आर.आर पाटील यांनी स्वर्गीय आर. आर. आबांचे स्वप्न साकार करीत कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर एकहाती सत्ता खेचून आणल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.”

या पोस्टसोबत अश्विनी महांगडे यांनी नेत्यांसोबतचे फोटोदेखील शेअर केले आहेत.

किरण माने चर्चेत असतानाच आता एका अभिनेत्रीची राजकीय पोस्ट

एका राजकीय पोस्टमुळे सातार्‍याचे प्रसिध्द अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचे प्रकरण ताजे आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत सातार्‍याचे अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र लोकप्रिय झाले होते. अभिनेता किरण हे त्यांच्या फेसबूक पेजवरुन अनेक विषयांवर बेधडकपणे भाष्य करत असतात. त्यातच त्यांची एक राजकीय पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे माने यांना संबंधित मालिकेतून वगळण्यात आले. आता पुन्हा एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एका राजकीय नेत्याचे अभिनंदन केले आहे.

 

Back to top button