कवठेमहांकाळ; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचेही लक्ष लागलेल्या आणि नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत 17 पैकी 10 जागा जिंकत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीला सहा जागा मिळाल्या. एका अपक्षानेही बाजी मारली. नगरपंचायत निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी असा चुरशीचा सामना रंगला होता. माजी मंत्री अजितराव घोरपडे, खासदार संजय पाटील, महांकालीच्या अध्यक्षा अनिता सगरे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती गजानन कोठावळे आणि काँग्रेस यांनी एकत्रित येत शेतकरी विकास आघाडी स्थापन केली. दुसरीकडे आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या चिन्हावर सर्वच प्रभागात उमेदवार उभे केले होते.
निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला होता. आरपीआय व भाजप यांनीही उमेदवार उभे केल्याने चुरस होती. मात्र राष्ट्रवादीने एकहाती सत्ता घेतली. आमदार सुमनताई पाटील, युवा नेते रोहित पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार आणि मते पुढीलप्रमाणे : प्रभाग एक : सिंधुताई शिवाजी गावडे – अपक्ष (शे. वि. आ. पुरस्कृत) (235), प्रभाग दोन : संजय लक्ष्मण माने – राष्ट्रवादी (324), प्रभाग तीन : ज्ञानदेव महादेव बेंडे – राष्ट्रवादी (352), प्रभाग चार : राहुल गणेश जगताप – राष्ट्रवादी (248), प्रभाग पाच : समिया रियाज शेकडे – शेतकरी विकास आघाडी (326), प्रभाग सहा : मीराबाई ईश्वर वनखडे – राष्ट्रवादी (220), प्रभाग सात : गणपती आप्पासाहेब सगरे – शेतकरी विकास आघाडी (384), प्रभाग आठ – रणजीत रमेश घाडगे (251), प्रभाग नऊ : शीतल अजय पाटील – शेतकरी विकास आघाडी (290), प्रभाग दहा : बद्रुद्दीन शिरोळकर – राष्ट्रवादी (243), प्रभाग अकरा : अनिता प्रशांत खाडे – राष्ट्रवादी (226), प्रभाग बारा : अजित बाळासाहेब माने – शेतकरी विकास आघाडी (356), प्रभाग तेरा : शुभांगी जगन्नाथ शिंदे – शेतकरी विकास आघाडी (398), प्रभाग चौदा : नलिनी सुनील भोसले – राष्ट्रवादी (417), प्रभाग पंधरा : अश्विनी महेश पाटील – राष्ट्रवादी (248), प्रभाग सोळा : संजय विठ्ठल वाघमारे – राष्ट्रवादी (275), प्रभाग सतरा : जयश्री सोमनाथ लाटवडे – राष्ट्रवादी (496).
अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संतोष मोरे, तहसीलदार बी. जे. गोरे यांच्या मार्गदर्शनाने मतमोजणी झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
नव्या चेहर्यांना संधी… दिग्गज पराभूत…
नगरपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती गजानन कोठावळे, माजी नगराध्यक्षा साधना कांबळे, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, माजी उपनगराध्यक्षा स्वाती पाटील, माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांचा पराभव झाला. निवडणुकीत नव्या चेहर्यांना संधी मिळाली. जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपती सगरे निवडणुकीत विजयी झाले.