

गोरखपूर : जर एखाद्या मुलाचे अपहरण झाले असेल तर त्याचा नेमका ठावठिकाणा शोधून काढणे हे मोठेच आव्हान असते. अशावेळी जर बूट तुमच्या मदतीला धावून आला तर! धक्का बसला ना. पण, थांबा. तुमचा नेमका पत्ता सांगणारा हा बूट गोरखपूरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साकारला आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही कठीण प्रसंगी संबंधित व्यक्तीचे आयुष्य सुरक्षित करण्याकामी हा बूट मोलाची भूमिका बजावू शकते.
त्यासाठी विद्यार्थ्यांनी जीपीएस ट्रॅकर, हार्टबीट सेन्सर, जीएसएम सिम, चिप, आदी गोष्टींचा वापर केला आहे. लहानग्यांचे अपहरण रोखले जाईल, भूकंपासह अन्य नैसर्गिक आपत्तींमध्ये लोकांचे जीवन सुरक्षित रहावे अशा हेतूने हा बूट तयार करण्यात आला आहे. हा बूट घातलेला माणूस अगदी ढिगार्याखाली दबला गेला तरी त्याला सहज शोधून बाहेर काढता येईल.
त्याचप्रमाणे एखाद्या मुलाचे अपहरण झाले तर त्याचे लोकेशन सहज मिळण्यास हा बूट मदत करू शकते. डोंगराळ तसेच बर्फाच्छादित प्रदेशातील वादळात एखादी व्यक्ती अडकली तर तिलासुद्धा या बूटाद्वारे सहज शोधता येऊ शकते. स्मार्ट बूट बनवणारा विद्यार्थी आदित्य सिंह म्हणतो, आम्ही बनवलेल्या बुटाला जीपीएस ट्रॅकर, हार्ट बीट सेन्सर, तापमान सेन्सर तसेच जीएसएम मॉडेल या गोष्टींशी कनेक्ट केले आहे.
जर तुम्ही हा बूट घातला असेल आणि तुम्ही अडचणीत आला असाल तर त्यावेळी पालकांकडे किंवा पोलिसांकडे नोटीफिकेशन कॉल जाईल. त्यामुळे पुढची पावले उचलणे सहज शक्य होणार आहे. जर हे बूट घालणारी व्यक्ती नर्व्हस झाली तर पायाचा तळवा थंड होतो. तथापि, अशा स्थितीत बुटात बसविलेल्या खास सेन्सरद्वारे तापमानाची जाणीव होते. यातूनच पालकांना जीपीएस मोडमध्ये कॉल जातो. त्यानंतर जीपीएसच्या माध्यमातून मुलांचा शोध घेणे सोपे होणार आहे.
हेही वाचा :