

नवी दिल्ली : भारताभोवती अनेक देशांच्या सीमा आहेत. त्यामुळे तिथे आगळेवेगळे चित्र पाहायला मिळते. भारत-म्यानमार सीमेवरील असेच एक गाव नव्याने चर्चेत आले आहे. कारण, या गावातील लोक जेवतात भारतात आणि झोपतात म्यानमारमध्ये. लोंगवा हे या गावाचे नाव. ते नागालँड राज्यातील मोन जिल्ह्यात आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव देशातील शेवटचे गाव ( Unique Village ) म्हणूनही ओळखले जाते. अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. या गावाचा एक व्हिडीओ नागालँडचे मंत्री टेमजेन इमना अलँग यांनी शेअर केला आहे.
हे गाव भारत आणि म्यानमारच्या सीमेमुळे दोन भागात विभागले आहे. यामुळेच तिथल्या रहिवाशांना दुहेरी नागरिकत्वाचा लाभ मिळतो. गावातील नागरिकांना दोन्ही देशांमध्ये मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. तेथील घरांचा काही भाग भारतात तर उर्वरित भाग म्यानमार देशात आहे. काही मुले भारतातील शाळेत जातात आणि काही मान्यमारमधील शाळेत शिकतात. गावातील अनेक घरांच्या खोल्यादेखील सीमेमुळे विभागल्या गेल्या आहेत. म्हणजेच अनेकांचे किचन भारतात, तर बेडरूम म्यानमारमध्ये आहे. म्हणूनच तर येथील लोक जेवतात भारतात आणि झोपतात म्यानमारमध्ये असे म्हटले जाते.
लोंगवातील लोकांना कोण्याक म्हणतात. कोण्याक भारतातील सर्वात दुर्मीळ आदिवासी जमात आहे. कोण्याक लोक शत्रूच्या डोक्याच्या कवट्या गोळा करतात व त्या कवट्यांचे हार स्वतःच्या गळ्यात घालतात. शत्रू पक्षाला आपली ताकद दाखवण्यासाठी ते अशा प्रकारचा पोशाख करतात. पाच हजार वस्तीच्या या गावातली 742 घरे भारतात असून 224 घरे म्यानमारमध्ये आहेत. या लोकांचा राजा म्हणजे आंग. त्याचा राजमहाल 100 वर्षांहून अधिक जुना आहे. गावातील इतरांप्रमाणे आंगदेखील जेवतो भारतात आणि झोपतो म्यानमारमध्ये. कारण, त्याच्या राजमहालाचा अर्धा भाग म्यानमारमध्ये आहे.
आंग हाच कोण्याक जमातीचे प्रतिनिधित्व करतो. लोकांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्या तो सरकारपर्यंत पोहोचवतो. भारताची म्यानमारसोबत आंतरराष्ट्रीय सीमारेषा निश्चित झाली तेव्हा भारत अथवा म्यानमार यापैकी कोणीही लोंगवावर ताबा मिळवण्यासाठी दावा केला नाही. यामुळेच या गावातून सीमा जात असली तरी येथील ग्रमास्थांना या सीमेचे बंधन नाही.
हेही वाचा :