एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे

Shivsena Vardhapan Din | शेवटी नकली ते नकली! वर्धापनदिनी ठाकरे गटाचा शिंदेंवर हल्लाबोल

Published on

पुढारी ऑनलाईन : शिवसेनेचा आज ५७वा वर्धापनदिन (Shivsena Vardhapan Din) साजरा होत आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचा दोन वेगळ्या ठिकाणी हा वर्धापन दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

"शिवसेनेच्या जडणघडणीत, पर्यायाने महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचे योगदान काय? शिवसेना स्थापन झाली तेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता. आता म्हणे 'आम्हीच शिवसेनेचे निर्माते!' हा असा आव आणणाऱ्यांची कमरेवरची वस्त्रं दिल्ली दरबारी उभे राहताच भीतीने भिजतात." अशा शब्दांत ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेवर निशाणा साधलाय.

शिवसेना ५७ वर्षांची झाली हा एक चमत्कार म्हणावा लागेल. स्थापनेपासून शिवसेना संकटाचा आणि फाटाफुटीचा सामना करीत आहे; पण कोणी कितीही बेइमानी केली तरी 'सामना' शिवसेनाच जिंकत आली व सर्व महाराष्ट्रद्रोही कचरा उडावा तसे उडून गेले. हा आजचा वर्धापन दिन खासच म्हणावा लागेल. वर्षभरापूर्वी याच काळी शिवसेनेतील ४० बेइमानांनी आईच्या दुधाशी गद्दारी केली. ते भाजपास सामील झाले व 'आम्हीच खरी शिवसेना' असे मिरवू लागले. अर्थात शिवसेनेच्या स्थापनेपासून असे प्रतिशिवसेना स्थापणारे आले आणि काळाच्या ओघात नष्ट झाले. पुराण काळात प्रतिसृष्टी निर्माण झाली. प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी वगैरे गमतीजमती सुरूच असतात; पण सोन्यापुढे लोखंड कसे टिकणार? चोरलेल्या आमदार, खासदारांचा आकडा म्हणजे वैचारिक बैठक नव्हे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

दिल्लीच्या चरणी थैल्या वाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळवणारे शिवसेनेचे नाव घेतात तेव्हा शिवसेनेसाठी रक्त सांडणारे असंख्य आत्मे चिडून तडफडत असतील. शिवसेना ही वाघाची डरकाळी आहे. ५७ वर्षे ती घुमतच आहे.

शेवटी नकली ते नकली आणि असली ते असली! गद्दार ते गद्दार आणि खुद्दार ते खुद्दारच! महाराष्ट्रातील जनता खुद्दार कोण आणि महाराष्ट्रधर्माच्या पाठीत खंजीर खुपसणारे गद्दार कोण हे ओळखते. महाराष्ट्राचा खरा वाघ आणि महाराष्ट्राशी बेइमानी करणारे 'मिंधे' वाघ यातील फरक जनता ओळखून आहे. डरकाळी पह्डतो तो वाघ असतो आणि ओरडतो तो लांडगा. महाराष्ट्रात सध्या डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे सुरू आहे. असे अनेक कोल्हे-लांडगे मागील ५७ वर्षांत महाराष्ट्राच्या वाघाने शिकार करून फस्त केले आहेत. महाराष्ट्रात गेली ५७ वर्षे वाघाचीच डरकाळी घुमत आली आहे आणि घुमत राहणार आहे. महाराष्ट्रातील मिंध्या कोह्या-लांडग्यांचे केकाटणे वाघाच्या डरकाळीत विरून जाणार आहे. शिवसेना ही मर्द मावळ्यांची भगवद्गीता आहे. आज मा. बाळासाहेब शरीराने आपल्यात नाहीत, पण त्यांचा अंगारी विचार हाच आपला अग्निपथ आहे. खरी शिवसेना तीच, जिच्या पोटात एक ओठात दुसरे नाही. ओठात एक व पोटात भलतेच हा दांभिक कावा शिवसेनेस ठाऊक नाही. इथे सकाळी निष्ठेच्या आणाभाका घ्यायच्या व रात्रीच्या अंधारात सुरतचा ढोकळा खायला पळून जायचे हे दळभद्री उद्योग शिवसेनेच्या रक्तात नाहीत. शिवसेना ५७ वर्षांची झाली व तिची घोडदौड यापुढेही सुरूच राहील ती याच प्रामाणिकपणामुळे. मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या!, असेही ठाकरेंच्या शिवसेनेने पुढे म्हटले आहे.

संघर्ष सुरुच….

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी २० जूनला विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी बंड केल्यानंतर राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. आता त्याला वर्ष होत आहे, तरीही राजकीय कुरघोड्या आणि संघर्ष थांबलेला नाही. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह दिल्याने पहिल्यांदा शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाशिवाय उद्धव ठाकरेंना हा मेळावा घ्यावा लागणार आहे. (Shivsena Vardhapan Din)

 हे ही वाचा ;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news