ठाकरे-शिंदे गटाचे आज जोरदार शक्तिप्रदर्शन | पुढारी

ठाकरे-शिंदे गटाचे आज जोरदार शक्तिप्रदर्शन

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सोमवारी (दि. 19) साजरा होत असून, इतिहासात पहिल्यांदाच दोन ठिकाणी हा वर्धापन दिन साजरा होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा वर्धापन दिन नेहमीप्रमाणेच षण्मुखानंद सभागृहात साजरा होईल, तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचा गोरेगाव नेस्को संकुलात साजरा होणार आहे. दोन्ही बाजूने शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी करण्यात आली असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी 20 जूनला विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी बंड केल्यानंतर राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. आता त्याला वर्ष होत आहे, तरीही राजकीय कुरघोड्या आणि संघर्ष थांबलेला नाही. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह दिल्याने पहिल्यांदा शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाशिवाय उद्धव ठाकरेंना हा मेळावा घ्यावा लागणार आहे.

लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यानंतर विधानसभा होतील. एकूणच आता पुढचे वर्ष राजकीय रणधुमाळीचे असणार आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे शिंदे गटावर, तर शिंदे गट उद्धव ठाकरे गटावर तुटून पडतील. उद्धव ठाकरे गटाचे महाशिबिर रविवारी पार पडले. त्यात उद्धव ठाकरे यांच्या भाषणात वर्धापन दिनाच्या भाषणाची झलक दिसली. आता हे दोन्ही गट सोमवारी काय भूमिका मांडतात, याबाबत उत्सुकता आहे.

शिंदे गट आणखी धक्का देणार

शिंदे आणि ठाकरे गटाने यावेळी मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे उद्धव ठाकरे गटाला सातत्याने धक्के देत आहेत. आतापर्यंत मुंबई महापालिकेतील 12 माजी नगरसेवक शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मनीषा कायंदे यांच्या रूपाने ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधीच ठाकरे गटाने त्यांची पक्ष प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली आहे. शिशिर शिंदे यांनीही उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आणखी काही नेत्यांना गळाला लावून एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची शक्यता आहे.

Back to top button