

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा वार्षिक योजनेतील निधीवरून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत वाद असून महाविकास आघाडीचा हा वाद नाही. पालकमंत्री भुजबळ यांना निधी वाटपाचा अधिकार नसतानाही गैरप्रकारे निधी वाटप करून नांदगाव मतदार संघावर अन्याय केला आहे. तसेच निधीचे असमान वाटप करून त्यांनी ठेकेदारांना पैसे दिल्याचा आराेप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला. याचबरोबर २५ वर्षापूर्वी भाजीपाला विक्री करणारा अचानक २५ हजार कोटींचा मालक होतो असा टोला ही शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी लगावला.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. कांदे यांच्यासह शिवसेनेचे विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आ. कांदे यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समितीतील निधीचा समान वाटप करणे आवश्यक असताना पालकमंत्री भुजबळ यांनी निधीचे असमान वाटप केले.
७५० ते ८०० कोटी रुपयांच्या निधीपैकी १२ कोटी रुपयांचा निधी नांदगावला तर ८० कोटींचा निधी येवला मतदार संघासाठी दिला.
त्यातही नांदगावच्या निधीमध्ये १२ पैकी १० कोटी रुपये गैरप्रकारे ठेकेदारांना दिले.
पालकमंत्र्यांनी अधिकार नसतानाही निधीचे असमान वाटप करून मतदार संघावर अन्याय केले आहेत.
सर्वाधिक निधी समता परिषदेलाच दिला असून आम्ही उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यात भुजबळ यांचे पालकमंत्री पद रद्द करण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे हा लढा पक्षीय नसून अन्यायाविरोधात लढणारा शिवसैनिकाचा असल्याचेही आ. कांदे यांनी सांगितले.
छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आ. कांदे यांनी केला आहे.
यात छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून ही धमकी आल्याची चर्चा रंगल्यानंतर आ. कांदे यांनी सांगितले की, याआधीही मुंबईतील व्यावसायिक ललीत टेकचंदाणी यांना गँगस्टर अनिस कासकर याच्या हस्तकाने जीवे मारण्याची धमकी दिली होती.
त्यावेळी भुजबळ यांच्या सांगण्यावरून ही धमकी दिल्याची तक्रार आहे.
त्यामुळे भुजबळ यांचा धमकी देण्याचा पुर्वइतिहास असल्याचे कांदे यांनी सांगितले.
'मी कधीच भाई युनिर्व्हसिटीत गेलो नाही, अन या भाई युनिर्व्हसिटीचा मी कधीच विद्यार्थी नव्हतो', जे भाई युनिर्व्हसिटीचे विद्यार्थी असतील त्यांची आपआपसात चर्चा होत असेल' असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आ. कांदेना लगावला आहे. त्यास प्रतिउत्तर देताना आ. कांदे यांनी सांगितले की, भुजबळ हे भाई युनिर्व्हसिटीचा विद्यार्थी नाही प्राचार्य आहेत. तसेच त्यांच्याकडे आणखी एक पैसे कमवण्याची युनिर्व्हसिटी असून २५ वर्षापूर्वी भाजीपाला विक्री करणारा अचानक २५ हजार कोटींचा मालक होतो असाही टोला आ. कांदे यांनी लगावला.
पत्रकार परिषदेत माहिती देताना आ. सुहास कांदे यांनी सांगितले की, मी न्यायालयात उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत निधी वाटपावरून दाद मागितली आहे. तसेच भुजबळ यांचे गहु तांदुळ वाटप करणारे मंत्री पद नव्हे तर पालकमंत्री पद रद्द करण्याची मागणी केली आहे.
[box type="shadow" align="" class="" width=""][visual_portfolio id="45839"][/box]