

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'असत्यमेव जयते' असे ट्विट करीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) करण्यात आलेल्या कारवाईवर टीका केली आहे. ईडी किंवा सीबीआय मागे लागली आहे, याची कल्पना होती. या कारवाईचे त्यामुळे आश्चर्य वाटत नाही. पंरतु, ईडीकडून दादर मधील राहते घर जप्त करण्यात आल्याने केंद्रीय तपास यंत्रणाचा बेकायदेशीर कारवाईचा प्रत्यय येतो. या कारवाईमुळे संजय राऊत किंवा शिवसेना खचली आहे,असे कुणाला वाटत असेल तर त्यात तथ्थ नाही,अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांसोबत बोलतांना व्यक्त केली.
महाराष्ट्रात सरकार स्थापने पासूनच ते पाडण्यासाठी दबाव येत आहे. यासंबंधी सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवून माहिती दिली आहे. सरकार पाडण्यात मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा लावून अटक करू अशा धमक्याही देण्यात आल्या. यासंबंधी सभापतींना लिहिलेल्या पत्रातून संपूर्ण माहिती दिल्याचे राऊत म्हणाले. सूडाने करण्यात आलेल्या कारवाया तसेच असत्यासमोर कधीही गुडघे टेकणार नाही, झुकणार नाही,असे रोखठोक मत त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.
ईडीकडून जे घर जप्त करण्यात आले आहे ते कष्टाच्या पैशातून घेतले आहे. २००९ मध्येच घर तसेच गावची लहानशी जमीन घेतली. भ्रष्टाचाराचा एक रूपया ही माझ्या अथवा पत्नीच्या खात्यावर आला असेल तर संपूर्ण संपत्ती भाजपला दान करेल, असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले. वास्तविक पाहता भाजपच्या देणगीदारांची चौकशी ईडीने करायला हवी.पंरतु, आमच्यासारख्या मराठी मध्यमवर्गीय माणसांवर कारवाई होत आहे. याने काही फरक पडणार नाही.महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवे कशाप्रकारे कारवाया सुरू आहेत. राहत्या घरावर सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. हा सूड मराठी माणसावर घेतला जात आहे. एवढे खालचे राजकारण महाराष्ट्राने कधी बघितले नाही, असा दावा देखील त्यांनी केला.
कायद्याने राहते घर जप्त करता येत नाही. राज्यसभेच्या प्रत्येक प्रतिज्ञापत्रात दादरमधील जागेच्या व्यवहारासंबंधी माहिती दिली आहे. ५५ लाखांचे कर्ज असल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रविण राऊत यांच्या प्रत्नीकडून ते कर्ज घेण्यात आले होते. ते पैसे परतही गेले असून याबाबत प्राप्तीकर विभागाला कळवले असल्याचे देखील राऊत यांनी स्पष्ट केले.
पत्राचाळ काय आहे हे माहिती नाही. पंरतु, सिद्धच करायचे असेल तर आरोपपत्रात काहीही टाकू शकतात.मेहुल चौकशी,नीरव मोदी पंतप्रधानांसोबत परदेश दौऱ्यावर गेले होते. मग आम्ही त्यांचे पंतप्रधानांसोबत नाव जोडायचे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. पंरतु,देशात खोट्या केसेस, खोटे पुरावे कधी निर्माण झाले नव्हते.ते आता होत आहे, अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली. कष्टाच्या, घामाच्या पैशाने घेलेल्या जागा असल्याने कायदेशील लढा देवू. शरद पवारांचा तसेच मुख्यमंत्र्यांचा फोन येवून गेला. सर्व सहकारी फोन करीत आहेत, असे ते म्हणाले.
या कारवाईने मी मौनात नाही जाणार,ते जातील.मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, माझ्या धमण्यात शिवसेना आहे. काय करणार तुम्ही? माझ्या डोक्याला बंदूक लावाल ना ? मी वॉकला जातो, तेव्हा हरेन पंड्याप्रमाणे मला माराल, गोळी माराल. पंरतु, ही गोळी तुमच्यावरच उलटेल हे चॅलेंज आहे, असे आव्हान संजय राउत यांनी दिले.सरकारला धोका निर्माण व्हावा यासाठी संजय राऊतांनी गुडघे टेकावे म्हणून अशा कारवाया सुरु आहेत. पंतप्रधानांना यासंबंधी पत्र लिहिले आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल आता सरकारने एसआयटी नेमली आहे, असे ते म्हणाले.