आरोप सिद्ध झाल्यास सर्व संपत्ती भाजपला दान करीन : संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझ्या मागे ईडी मागे लागली आहे, याची मला पूर्वकल्पना होती. त्यांच्या या कारवाईला मी घाबरत नाही. ईडीच्या कारवायांसमोर कधीही गुडघे टेकणार नाही. कष्टाने कमावलेली संपत्ती 'ईडी'ने जप्त केली आहे. एकही रुपया अवैध मार्गने जमा झाला असेल तर संपत्ती भाजपला दान करू टाकू, असे टोला संजय राऊत यांनी लगावला. ईडीच्या कारवाईनंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली यावेळी ते बोलत होते.

आज शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीकडून मोठा दणका बसला. ईडीने राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांचे अलिबागमधील ८ भूखंड, दादरमधील १ फ्लॅट जप्त केले. या वृत्तानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

राऊत पुढे म्हणाले की, राजकीय सूड आणि बदल्यासाठीच हा प्रकार सुरू आहे. कोणत्या थराला हे लोक जातात हे तुम्ही पाहात आहात, असं सांगतानाच कारवाई झाली. ठिक आहे. आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. त्यातून आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते, माझ्या धमन्यांमध्ये शिवसेना आहे. अशा कारवायांना मी आणि माझे कुटुंबिय घाबरत नाही. जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. महाराष्ट्राला समजेल की मराठी माणसाला कसा त्रास दिला जातो. अशा कारवायां पुढे शिवसेना वाकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असे प्रत्युत्तर राऊत यांनी दिले.

आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली आहे. त्यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. २००९ मधील ही प्रॉपर्टी आहे. इतक्या वर्षानंतर ईडीला त्यात आता मनी लॉन्ड्रिंग दिसत आहे. या जमिनीच्या व्यवहारासाठी एक रुपया जरी आमच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंगचा आला असेल आणि मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली असले तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करून टाकू, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्यांचा आरोप

संजय राऊत यांना ईडीच्या कारवाईची पुर्वकल्पना होती, असे विधान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सोमय्या पुढे म्हणाले की, पोलिसांचा माफिया म्हणून वापर करून कारवाई टाळता येणार नाही. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्यात संजय राऊत यांचा रोल काय आहे याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोमय्यांनी केली. राऊतांनी ५५ लाख परत केले होते. ईडीची कारवाई टाळता यावी यासाठी त्यांचा खटाटोप सुरू होता, आरोपही राऊत यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना एकदाही प्रश्न का विचारला नाही? ठाकरे परिवाराचे गैव्यवहार समोर आणणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news