Share Market Updates | घसरणीनंतर शेअर बाजाराची जोरदार वापसी, सेन्सेक्स निच्चांकावरुन ६५० अंकांनी वाढला

Share Market Updates | घसरणीनंतर शेअर बाजाराची जोरदार वापसी, सेन्सेक्स निच्चांकावरुन ६५० अंकांनी वाढला
Published on
Updated on

Share Market Updates : वाढत्या कोरोनामुळे जागतिक बाजारातून कमकुवत संकेत आहेत. यामुळे गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ३०० हून अधिक अंकांनी घसरून ६०,५०० वर आला होता. तर निफ्टी ८२ अंकांच्या घसरणीसह १८ हजारांवर होता. त्यानंतर बाजार बंद होण्याआधी शेअर बाजार सावरला आणि दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात आले. सेन्सेक्स २२३ अंकांच्या वाढीसह ६१,१३३ वर तर निफ्टी ६८ अंकांनी वधारून १८,१९१ वर बंद झाला. सेन्सेक्स दिवसातील निच्चांकावरुन सुमारे ६५० अंकांनी वाढला आहे. दरम्यान, बँक निफ्टी १.१५ टक्क्याने म्हणजेच ८२७ अंकांनी वाढून ४३,३१४ वर गेला.

ओएनजीसी वधारला, तर टाटा कन्झुमर प्रॉडक्ट्सला फटका

माहिती तंत्रज्ञान, ऑटो, तेल आणि वायू आणि मेटल शेअर्स सुमारे ०.५ टक्क्यांनी कमी झाल्याने बहुतेक प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक घसरले. डॉ रेड्डी, टाटा स्टील, इन्फोसिस, अदानी एंटरप्रायझेस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे निफ्टी ५० वरील सर्वात सक्रिय स्टॉक्स होते. NSE निफ्टी निर्देशांकात फक्त चार स्टॉक्समध्ये वाढ दिसून आली. ओएनजीसी, टाटा स्टील, सन फार्मा आणि भारती एअरटेल यांचा त्यात समावेश होता. त्यातील ओएनजीसी ०.७६ टक्क्यांनी वाढला. टाटा कन्झुमर प्रॉडक्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, ग्रासिम आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे पिछाडीवर राहिले. यातील टाटा कन्झुमर प्रॉडक्ट्सचे शेअर्स १.८७ टक्क्यांनी खाली आले. टॉप निफ्टी ५० लूजर्समध्ये टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, अपोलो हॉस्पिटल, हिंदाल्को इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, ग्रासीम इंडस्ट्रीज, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स, सिप्ला यांचा समावेश होता.

चौफेर विक्रीचा मारा

कोरोना आणि आर्थिक मंदीच्या धास्तीने आजच्या व्यवहारात चौफेर विक्री दिसून आली. बँक आणि आयटी निर्देशांक निफ्टीवर अर्धा टक्क्याने कमकुवत झाले आहेत. फार्मा निर्देशांक हिरव्या चिन्हात व्यवहार केला. फायनान्सियल, मेटल आणि ऑटो निर्देशांकासह इतर सर्व लाल चिन्हात राहिले. सुमारे १,३४९ शेअर्स वाढले, तर १,८०९ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १२४ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आली नाही.

कोरोनाच्या धास्तीमुळे अमेरिकेतील शेअर बाजाराला धक्का बसला आहे. रात्रभर अमेरिकेतील प्रमुख निर्देशांकांत सुमारे १ टक्क्यांची घसरण झाली. नॅस्डॅक कंपोझिट आणि S&P 500 अनुक्रमे १.३५ टक्क्यांनी आणि १.२ टक्क्यांनी घसरला, तर डाऊ जोन्स १.१ टक्क्यांनी खाली आला.

तेलाच्या किमती घसरल्या

या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात नकारात्मक वातावरण आहे. चीनमधील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. चीन हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल खरेदीदार देश आहे. पण येथे कोरोनाच्या उद्रेकामुळे तेलाच्या मागणीत सुधारणा होण्याची आशा धूसर बनली आहे. यामुळे तेलाच्या किमती घसरल्या आहेत. फेब्रुवारी डिलिव्हरीच्या ब्रेंट फ्यूचर्समध्ये १ टक्क्यांनी घसरण होऊन दर प्रति बॅरल ८२.४७ डॉलरवर आला. तर यूएस क्रूड प्रति बॅरल ७८.१६ डॉलर पर्यंत घसरले.

आशियाई बाजारात घसरण

अमेरिकेच्या शेअर बाजारातील घसरण झाल्यानंतर गुरुवारी टोकियोचे शेअर्स कमी झाले. गुंतवणूकदारांनी नवीन वर्षाच्या सुट्टीपूर्वी जोखीम टाळण्याचा प्रयत्न केला. बेंचमार्क निक्केई २२५ निर्देशांक ०.९४ टक्के म्हणजेच २४६.८३ अंकांनी घसरून २६,०९३ वर बंद झाला, तर टॉपिक्स निर्देशांक ०.७२ टक्के म्हणजेच १३.७५ अंकांनी घसरून १,८९५ वर आला. (Share Market Updates)

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news