लक्ष्मीची पाऊले : पाच महिन्यांत एक कोटी नवे गुंतवणूकदार | पुढारी

लक्ष्मीची पाऊले : पाच महिन्यांत एक कोटी नवे गुंतवणूकदार

डॉ. वसंत पटवर्धन

मध्यम वर्गातील लोकांची क्रयशक्ती वाढत चालली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीनंतर आता लोक घरांच्या व वाहनांच्या खरेदीकडे जास्त वळू लागले आहेत. गेल्याच महिन्यातील म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये लोकांनी 2 लाख 76 हजार प्रवासी वाहनांची खरेदी केली. 2021 च्या नोव्हेंबरपेक्षा 2022 नोव्हेंबरमधील वाहन खरेदीचे प्रमाण 28 टक्क्यांनी अधिक आहे. देशातील रस्तेही चांगले होत असल्यामुळे लोकांना आता रेल्वेपेक्षा स्वत:च्या मोटारीने प्रवास करणे आनंददायी वाटते. दुचाकी वाहनांच्या स्वयंचलित स्कूटर्स वगैरे विक्रीतही नोव्हेंबर 2022 मध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली. स्वत:चे वाहन असल्यानंतर आपल्याला प्रवासाची वेळ पुढे-मागे करता येते व वेगही कमी-जास्त करता येतो. सुदैवाने पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत. तसेच नोव्हेंबर 2022 मध्ये मोटारसायकलीची विक्री वाढून 7 लाख 88 हजारांच्यावर गेली आहे. एका वाहनाच्या उत्पादनामुळे 10 जणांना रोजगार मिळतो.

मोटारीप्रमाणे विमानप्रवास करण्याची लोकांची प्रवृत्तीही वाढत आहे. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा प्रवासाचा वेळ वाचतो. तेवढ्याच वेळात जास्त कामे करता येतात. त्यामुळे टाटांच्या एअर इंडियाच्या महाराजाला जास्त विमाने खरेदी करायला लागणार आहेत. 500 नवीन विमाने त्यांच्या ताफ्यात घेतली जाणार आहेत. या विमानामध्ये 400 मोठ्या विमानांचा समावेश आहे. बाकीच्या 100 विमानांमध्ये ‘एअरबस ए 350 एस’, ‘बोईंग 787 एस’, ‘बोईंग 777 एस’चा समावेश असण्याची शक्यता आहे. या खरेदीमुळे बँका व विमा कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणावर व्यवसाय मिळेल.

शेअर बाजारात समभागांच्या खरेदीसाठी आता जास्त निवेशक आकर्षित होऊ लागले आहेत. आता शेअर बाजारात 12 कोटींपेक्षा जास्त लोक गुंतवणूकदार आहेत. गेल्या 5 महिन्यांत नवीन 1 कोटी गुंतवणूकदार बाजारात आले. बॅँकांतील मुदती ठेवीवरील व्याजापेक्षा इथे जास्त परतावा मिळतो. मात्र त्यासाठी निवेशकांनी तज्ञांचा सल्ला घेणे, त्यांचे लेख वाचणे महत्त्वाचे आहे. पूर्ण माहिती घेतल्याखेरीज कुठलीही गुंतवणूक करणे व जोखीम घेणे इष्ट नसते. यापूर्वी 8 कोटी निवेशकांचा टप्पा गाठल्यानंतर पुढील 1 कोटी गुंतवणूकदार वाढण्याची फक्त 85 दिवस लागले. पुढील 1 कोटी निवेशकांची वाढ होण्यासाठी फक्त 91 दिवस लागले. पुढचे 1 कोटी निवेशक वाढण्यासाठी 124 दिवस लागले.

थोडासा शेअर बाजाराचा इतिहास बघितला तर पुढील गोष्टी निदर्शनास येतात. मुंबई शेअर बाजार 1875 साली सुरू झाला. त्याला आता सुमारे 150 वर्षे झाली आहेत. 1875 साली स्थापन झालेल्या या कंपनीचे नाव बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज असे होते. त्यानंतरच्या काळात समभाग, कर्जरोखे, इक्विटी डेरिव्हेरिव्हज, करन्सी डेरिव्हेटिव्ह, इन्टरेस्ट रेट डेरिव्हेटिव्हज, म्युच्युमल फंडस् अशा सुविधा उपलब्ध झाल्या. मुंबई शेअर बाजाराची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ही संस्था एम. जे. फेरवाझी यांच्या पुढाकाराने सुरू झाली. या एक्चेंजनेही बाळसेही लगेच धरले. अनेक कंपन्या आता या दोन्ही एक्स्चेंजवर नोंदीत आहेत. 13 डिसेंबर 2022 ला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 62,500 च्या वर गेला आहे. ही घोडदौड अशीच चालू राहिली तर पुढील 5 वर्षांनंतर निर्देशांकाने 2027-28 ला 1 लाखाचा आकडा ओंलाडल्याचे दिसेल.

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाढ केल्यानंतर देशातील प्रमुख बँकांनीही आपल्या कर्जावरील व्याजाचे दर वाढवले आहेत. गेल्या आठवड्यात स्टेट बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात लक्षणीय वाढ केली आहे. सध्या गुंतवणूकदारांचा ओढा ‘सिस्टिीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी)कडे आहे. आपल्या मासिक उत्पन्नातून एक ठराविक रक्कम समभागात गुंतवण्याच्या क्रियेला पद्धतशीर निवेशन योजना म्हणतात. अशा प्रकारच्या गुंतवणुकीत नोव्हेंबर 2022 मध्ये निवेशकांनी खूप मोठी रक्कम घातली. एकूण 13 हजार 306 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. अशा गुंतवणुकीमुळे कोणत्याही उच्चांकी व नीच्चांकी पातळीला गुंतवणूक न होता गुंतवणूक सरासरी भावाने होते. नोव्हेंबर 2022 मध्ये 11.27 लाख नवीन खाती या योजनेत उघडली गेली. त्यामुळे आता एकूण ‘एसआयपी’ खात्यांचा आकडा 6 कोटी 4 लाखांवर गेला आहे. यावर्षी मे 2022 पासून गेल्या आठ महिन्यांत ‘एसआयपी’ खात्यांचा आकडा 6 कोटी 4 लाखांवर गेला आहे. यावर्षी मे 2022 पासून गेल्या आठ महिन्यांत ‘एस आयपीफ ’द्वारे किमान 12 हजार कोटी रुपये दरमहा गुंतवले गेले आहेत. या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर 2022 या आठ महिन्यांत एकूण 87 हजार 275 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. 2021-22 या आर्थिक वर्षात ‘एसआय पीफ ’चा एकूण आकडा 1.24 लाख कोटी रुपयांवर गेला.

Back to top button