

Share Market Closing : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. यामुळे भारतीय शेअर बाजारात आज गुरुवारी (दि.१६) तेजी दिसून आली. अमेरिकेतील मजबूत किरकोळ विक्रीच्या आकडेवारीमुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला आहे. तसेच देशांतर्गत बाजारात परकीय गुंतवणूकदार खरेदीकडे वळले आहेत. या पार्श्वभूमीवर आज सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत व्यवहार केला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ३८० अंकांहून अधिक वाढून ६१,६०० वर पोहोचला. तर निफ्टी सुमारे १०० अंकांच्या वाढीसह १८,१०० वर गेला. त्यानंतर बाजार बंद होताना दोन्ही निर्देशांक स्थिर पातळीवर आले. सेन्सेक्स ६१,३१९ वर बंद झाला. तर निफ्टी १८,०१४ वर स्थिरावला.
आजच्या व्यवहारात सर्वच क्षेत्रात चौफेर खरेदी दिसून आली. सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, एल अँड टी, रिलायन्स, टाटा स्टील आणि सन फार्मा हे टॉप गेनर्स राहिले. बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, एचडीएफसी, एचसीएल टेक आणि विप्रो हेदेखील वधारले. दरम्यान, मारुती सुझूकीच्या शेअर्समध्ये घसरण झाली. एनएसईवर अदानी टोटल गॅस, इंडिगो हे टॉप लूजर्स ठरले. अदानी ट्रान्समिशन, व्होडाफोन आयडिया हे शेअर्स देखील अनुक्रमे २.६० टक्के आणि २.५८ टक्क्यांनी घसरले.
आजच्या व्यवहारात आयटी निफ्टी सुमारे २ टक्क्यांने वाढला. MphasiS (४.३३ टक्के), टेक महिंद्रा (३.७३), एल अँड टेक्नॉलॉजी (३.५५ टक्के), टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (१.१७ टक्के) वाढल्याचे दिसून आले. टेक महिंद्राच्या शेअरमध्ये दोन दिवसांत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चौथ्या तिमाहीतील दमदार कमाईमुळे नेस्लेचा शेअर सुमारे २ टक्क्यांनी वाढला. नेस्ले इंडियाने डिसेंबर २०२२ ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ६६ टक्के वार्षिक (YoY) वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील नफा ३७९ कोटी होता. नेस्लेच्या बोर्डने २०२२ साठी प्रति इक्विटी शेअर ७५ रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे.
गुंतवणूकदारांनी खरेदीत रस दाखवल्याने अदानी शेअर्ससाठी गुरुवारचा दिवस महिन्यातील चांगला दिवस राहिला. अदानी समूहातील १० पैकी ८ शेअर्संनी आज ग्रीन झोनमध्ये व्यवहार केला. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २.४ टक्के वाढून १,८२१ रुपयांवर पोहोचला. तर एनडीटीव्ही आणि अदानी पॉवर यांचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये झेपावले. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानींच्या शेअर्स गेल्या १६ सत्रात मोठी घसरण झाली. यामुळे त्याचे बाजार भांडवल कमी होऊन १० लाख कोटींचे नुकसान झाले आहे. (Share Market Closing)
NSE वर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) ४३२.१५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) ५१६.६४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. या महिन्यात १५ फेब्रुवारीपर्यंत FII ने २,३५४.३७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली तर DII ने ७,६९६.१७ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. जानेवारी महिन्यात, FII ने ४१,४६४.७३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली तर DII ने ३३,४११.८५ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
जागतिक बाजारावर नजर टाकली तर अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात कमजोर दिसले. पण ते तेजीत बंद झाले. जानेवारीच्या मजबूत किरकोळ विक्रीच्या आकडेवारीनंतर शेअर बाजाराने उसळी घेतली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज ०.१ टक्के वाढून ३४,१२८ वर बंद झाला. तर एस अँड पी ५०० निर्देशांक ०.३ टक्के वाढून ४,१४८ गेला. नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक ०.९ टक्के वधारुन १२,०७० वर स्थिरावला. अमेरिकेतील तेजीचा मागोवा घेत आशियाई बाजारातही सकारात्मक वातावरण राहिले.
हे ही वाचा :