

पुढारी ऑनलाईन
गतवर्षी अशोक युनिव्हर्सिटीतील अर्थशास्त्राच्या प्राध्यापक अश्विनी देशपांडे यांनी ट्विटरवर त्यांचा इजिप्तमधील अनुभव शेअर केला होता.
देशपांडे यांना अॅडव्हान्स पेमेंट करताना अडचणी येत होत्या. तेव्हा एका ट्रॅव्हल एजंटने त्यांना पैशाशिवाय तिकीट बुक करून दिले होते. कारण, तो ट्रॅव्हल एजंट बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मोठा चाहता आहे आणि शाहरूखच्या देशातून हे लोक इजिप्तला गेले होते म्हणून कृतज्ञता म्हणून तो असा वागला होता. आता शाहरूखने इजिप्तमधील त्या चाहत्याला आणि प्रा. अश्विनी देशपांडे अशा दोघांनाही गिफ्ट पाठवले आहे. शाहरूखची पर्सनल सेक्रेटरी पूजा ददलानी हिने हे सर्व घडवून आणले.
प्रा. अश्विनी देशपांडे यांनी ही माहितीदेखील ट्विट करून सर्वांना सांगितली आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'या कथेचा एक खूपच सुखांत शेवट. शाहरूख खानची स्वाक्षरी असलेली तीन छायाचित्रे आज आली आहेत. यातील एकात इजिप्तच्या त्या ट्रॅव्हल एजंटसाठी खूप सुंंदर संदेश होता. एक त्याच्या मुलीसाठी आणि एक माझ्यासाठी. धन्यवाद पूजा, केतकी संपर्कात राहण्यासाठी आणि शाहरूखलाही धन्यवाद!' दरम्यान, एसआरकेने घेतलेली ही दखल अनेक नेटकर्यांनाही आवडून गेली आहे.