

पुणे : ललित पाटीलचे ससूनमधून पलायन झाल्यानंतर अनेक अंतर्गत बाबी चव्हाट्यावर आल्या. आता ससूनचे अधिष्ठाता आणि त्यांच्या मुलासाठी स्पेशल शस्त्रक्रियागृह (ओटी) राखीव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निवासी डॉक्टरांच्या चेंजिंग रूमच्या ठिकाणी अधिष्ठातांच्या चिरंजीवांसाठी स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे ससूनमध्ये घराणे शाहीचा 'ठाकूर' पॅटर्न सुरू झाल्याची चर्चा आहे. ससून रुग्णालय हे पुण्यासह सोलापूर, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांमधील रुग्णांसाठी दिलासादायक आहे.
उपचारांसाठी येणार्या रुग्णांची दररोजची संख्या दीड ते दोन हजार इतकी असते. एकाच वेळी हजार ते बाराशे रुग्ण आंतररुग्ण विभागात दाखल होतात. रुग्णांवर उपचार करीत असताना निवासी डॉक्टरांच्या अनुभवात भर पडते. त्यासाठी सततचा सराव महत्त्वाचा असतो. मात्र, डॉ. संजीव ठाकूर यांचे युनिट वगळता इतर उदयोन्मुख डॉक्टरांना शस्त्रक्रियांची संधी मिळत नसल्याची चर्चा आहे. ससूनमधील रुग्णांची देखभाल करण्यात परिचारिकांसह इतर कर्मचार्यांचे मोठे योगदान असते. यातील अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा ताण निर्माण होतो.
सर्जिकल आयसीयूमध्ये परिचारिकांना रात्री संपूर्ण वेळ रुग्णांकडे लक्ष द्यावे लागते. मात्र, तेथे त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही की जेवणासाठी जागा नाही. याबाबत अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली. मात्र, मुलासाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर आणि बाजूला अवाढव्य केबिन उभारण्यात मात्र तत्परता दाखवल्याचे बोलले जात आहे.
परिचारिकांसह इतर कर्मचार्यांना सध्या कोणत्याही तक्रारी करण्यास वाव दिला जात नाही. 'डीन सध्या ताणात आहेत' एवढेच कारण सांगितले जाते. आम्ही रात्रपाळी करून रुग्णांची काळजी घेत असताना आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून स्वत:चा मुलगा डॉ. अमेय ठाकूरसाठी मात्र सुविधा निर्माण करण्यात येत असल्याची खंत कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी गेल्या शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीतही याकडे लक्ष वेधले होते. ससूनमध्ये मुलाला सेट करण्यासाठी तुम्ही आटापिटा करीत असल्याच्या तक्रारी आल्याबाबत पवार यांनी डॉ. ठाकूर यांच्याकडे विचारणा केली होती. त्यावर ठाकूर यांनी 'नो सर, नो सर' असे उत्तर दिले.
हेही वाचा