

जत, पुढारी वृत्तसेवा : बिळुर (ता. जत) येथे महावितरणच्या पथकास तुम्ही येथुन निघुन जावा असे म्हणत हुज्जत घालण्याचा प्रकार घडला. तसेच वीज चोरण्यासाठी वापरण्यात आलेली वायर जप्त करू न दिल्याने महावितरणने एकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अरूण हाक्के असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची महावितरणचे सहाय्यक अभियंता उमेश रामचंद्र माने यांनी फिर्याद दिली आहे. तसेच बेकायदेशीर हुक टाकल्याने विद्युत चोरी प्रकरणी ४५ हजाराचा दंडही केला आहे.
ही कारवाई सहाय्यक अभियंता उमेश माने, गिरश शिवाप्पा जांबगोड, सुनिल सिध्दप्पा गलगली,महातेश नाईक आदींनी केली आहे. ही घटना मंगळवार (दि. २६ जुलै) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महवितरणचे वीज चोरीचे पथक मंगळवारी बिळुर येथे गेले होते. दरम्यान गेंज्जीवस्ती येथे सहाय्यक अभियंता उमेश माने हे विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्र जवळ गेले असता तेथेच शेजारी असलेल्या घरामध्ये विजेचे बल्ब चालु दिसले व कडबाकुटी मशिन जोडलेली होती. त्यावेळेस घरात अधिकृत वीजकनेक्शन नव्हते.
वीज चोरी पथकाने उभा असलेल्या व्यक्तीस त्याचे नाव विचारले असता अरूण हाक्के याने तुम्ही माझ्या घराकडे माझ्या परवानगीशिवाय का आला? तुम्ही येथून निघुन जावा असे म्हणत हुज्जत घातली. चोरून आकडा टाकलेली वायर जप्त करू दिली नाही. चोरून वीज वापरल्याने हाक्के यांच्यावर ४५ हजार रुपयेच दंड केला आहे. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस करत आहेत.