

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत भारताच्या स्टार खेळाडूंना फटका बसला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताच्या सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे सामना न खेळल्यामुळे त्यांना आयसीसी क्रमवारीत नुकसान सोसावे लागले आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वनडे क्रमवारीत प्रत्येकी एक स्थान गमवावे लागले आहे. रोहित शर्मा आता पहिल्या पाचमधून बाहेर पडला असून विराट पाचव्या स्थानावर घसरला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधील टॉप 10 मध्ये रोहित आणि विराट हे भारतीय खेळाडू आहेत. या दोघांनाही मागे टाकत क्विंटन डी कॉकने चौथे स्थान पटकावले आहे. आता विराट 774 रेटिंग गुणांसह पाचव्या तर रोहित 770 रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. बाबर आझम 892 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तो पहिल्या स्थानावर असलेल्या ट्रेंट बोल्टपेक्षा 15 रेटिंग गुणांनी मागे आहे. बोल्टचे 704 रेटिंग गुण आहेत आणि बुमराहचे 689 रेटिंग गुण आहेत.
एकदिवसीय अष्टपैलू क्रमवारीत जसप्रीत बुमराहला दोन स्थानांचे नुकसान झाले असून तो 10व्या स्थानावर आला आहे. ओमानचा झीसान मकसूद आणि पाकिस्तानचा इमाद वसीम यांनी त्याला मागे टाकले आहे.
कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत ऋषभ पंत पाचव्या तर रोहित शर्मा नवव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या तर रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने बुमराहला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. अष्टपैलू रँकिंगमध्ये रवींद्र जडेजा पहिल्या तर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल 10 मध्ये एकमेव भारतीय फलंदाज आहे. तो 732 रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर कायम आहे. पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार आठव्या स्थानावर कायम आहे. त्याचे 658 गुण आहेत, तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या जोश हेझलवूडचे 792 गुण आहेत.