

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा'चे (Samruddhi Mahamarg) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी (11 डिसेंबर) लोकार्पण झाले. आज या शानदार सोहळ्यात स्वतः मोदी यांनी ढोलताशा पथकाशी संवाद साधतानाच ढोल पण वाजविला. वायफळ टोलनाकापर्यंत त्यांनी समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटर राईड केली. ढोल ताशांच्या गजरात लेझीमच्या निनादात जल्लोषात त्यांचे या ठिकाणी स्वागत झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे,भारती पवार, खासदार कृपाल तुमाने, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवारआदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वे स्टेशन येथे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही सहावी ट्रेन असून नागपूर ते विलासपूर ही ट्रेन धावणार आहे.
लोकार्पणनंतर मेट्रोच्या प्रदर्शनाला देखील त्यांनी भेट दिली. यावेळी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी त्यांना माहिती दिली. यानंतर पंतप्रधान खापरीच्या दिशेने मेट्रो सफरसाठी रवाना झाले. अनेक विद्यार्थ्यांशी, संवाद साधला. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सफाई कामगारांशी संवाद साधला. खापरी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफाएम्सच्या दिशेने रवाना झाला. एम्समध्ये डॉक्टरशी संवाद साधल्यानंतर एम्स लोकार्पण ते करतील.
कोणत्याही भागाचा विकास हा स्थानिक ठिकाणी दळण- वळणाची साधने किती चांगल्या दर्जाची आहेत, यावर ठरतो. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी रस्ते विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा'च्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी (कोकमठाण) या 520 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित शिर्डी ते मुंबई हा रस्ता जुलै 2023 पर्यंत खुला करण्यात येणार आहे. या महामार्गामध्ये राज्यातील दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांचा समावेश असून, सहापदरी असलेल्या या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे.