मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत रहा : काँग्रेस कार्यकर्त्यांचा नेत्यांना सल्ला

मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत रहा : काँग्रेस कार्यकर्त्यांचा नेत्यांना सल्ला
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारुण पराभव, मुंबईतही काँग्रेसचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळे येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सोबतच रहा, असा सल्ला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना दिल्याचे समजते.

भाजपचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन मुंबई महापालिका निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय या अगोदरच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. मात्र, काँग्रेसमध्ये अद्यापपर्यंत महाविकास आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतलेला नाही. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आजही सांगत आहेत. मात्र सध्याची काँग्रेसची परिस्थिती लक्षात घेता, स्वबळावर निवडणूक लढवणे पक्षासाठी धोक्याचे आहे. शिवसेनेमध्ये फूट पडली असली तरी मुंबईत शिवसेना म्हणजेच 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या पक्षाचा जोर कायम दिसून येत आहे.

मुंबईत काँग्रेसच्‍या अस्‍तित्‍वाचीच लढाई

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे अवघे 31 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षात काँग्रेसचा राजकीय आलेख उंचावलेला नाही. त्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत असलेल्या वादामुळे मुंबईतील सर्वच नेत्यांसह खासदारांनी आपआपले गट तयार केले आहेत. सर्वाधिक उत्तर भारतीय मुस्लिम मतदार काँग्रेसकडे होते. मात्र यातही आता मोठी घट झाली आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवणे म्हणजे मुंबईतील काँग्रेसचे अस्तित्व कायमस्वरूपी संपवण्यासारखे होईल, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

जिल्हानिहाय कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेसने जशी शिवसेनेला साथ दिली. तशी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत दिल्यास भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे शक्य होईल. तर दुसरीकडे मुंबईतील काँग्रेसचे अस्तित्व कायम राहील. एवढेच नाही तर मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत सत्तेच्या गादीवर बसता येईल, असा सल्ला कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना दिला आहे. काँग्रेस महाविकास आघाडीत सामील न झाल्यास मुंबईत 2017 च्या महापालिका निवडणुकीपेक्षा वाईट अवस्था असेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हा सल्ला काँग्रेसच्या काही नेत्यांना पटलाही आहे. यासंदर्भात येत्या काही दिवसात जिल्हानिहाय कार्यकर्त्यांशी संवाद साधून महाविकास आघाडीत सामील व्हायचे की नाही, याबाबत निर्णय घेणार असल्याचे समजते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news