

विक्री करणार्या लोकांचे कौशल्य आपल्या देशात वाखाणण्यासारखे आहे. पावसाळा आला की मान्सून सेल लागतात. डिस्काऊंट 20 टक्के, 30 टक्के, अगदी 50 टक्केपर्यंत दिला जातो. काही ठिकाणी दोन शर्ट घेतले तर पाच शर्ट फ्री अशीही ऑफर असते. एकावर एक फ्री किंवा एकावर तीन फ्री असे बोर्ड दिसले की, नकळत आपले लक्ष तिकडे जात असते. हीच व्यापार्यांच्या विक्री कौशल्याची खूण असते.
तुम्हाला असे वाटेल की, भारतीय लोकांना काहीही फ्रीमध्ये मिळण्याचे फार आकर्षण असते. त्यामुळे आपल्याकडे असे प्रकार होतात. असे अजिबात नाही, हे पहिल्यांदा ध्यानात घेतले पाहिजे. याच्यावर ते फ्री आणि त्याच्यावर हे फ्री हे परदेशात सर्रास असते आणि तीच लाट आता आपल्याकडे आली आहे. आज घराघरात वॉशिंग मशिन वापरले जाते. वॉशिंग मशिनचे जे लिक्विड असते ते घ्यायला तुम्ही गेलात तर त्याच्याबरोबर साबण किंवा इतर डिटर्जंट फ्री असतात. कशावर काहीही फ्री देऊन कोणीही नुकसानीत व्यवसाय करत नसते हे आधी समजून घेतले पाहिजे. दोनवर पाच शर्ट फ्री दिले तर त्या दोनची किंमत इतकी वाढवलेली असते की, व्यापार्यांना भरपूर नफा कमवता येतो. फ्री मिळाले म्हणून तुम्ही खूश आणि व्यापार झाला म्हणून ते खूश, असा काहीसा हा सगळा खुशी खुशीचा मामला आहे. सेलच्या पण जाहिराती स्वस्तात काही मिळते आहे याकडे तुमचे लक्ष आकर्षित करणे हा याचा उद्देश असतो. कुणी व्यापारी स्वतःच लिहितो की, व्यापारात नुकसान आल्यामुळे दुकान बंद करत आहे. त्यामुळे उरलेला सगळा माल अत्यंत कमी दरात विक्रीला काढलेला आहे. पटापट या आणि स्वस्तात कपडे घेऊन जा. अशा जाहिराती आपले लक्ष वेधून घेतात आणि नकळत आपली पावले या दुकानांकडे वळत असतात. मध्यंतरी एका आंघोळीचा साबण विक्रेत्या कंपनीने काही साबणांमध्ये सोन्याची नाणी ठेवली होती.
आमचा साबण वापरा आणि भाग्यवान लोकांनो सोन्याचे नाणे फ्रीमध्ये मिळवण्याची संधी प्राप्त करा, अशा जाहिराती करण्यात आल्या होत्या. नशिबाचे काही सांगता येत नाही. कुणाचे नशीब कधीही उघडू शकते या अपेक्षेने तुम्ही-आम्ही या साबणाच्या वड्या शेवटपर्यंत घासत वापरल्या. परंतु नाणे काही हाती लागले नाही. एवढ्या मोठ्या देशात करोडोंच्या संख्येने साबण विकले जात असतील तर कंपनीने किती साबणांमध्ये किती नाणी ठेवली होती याचा काही अंदाज आपल्याला येऊ शकत नाही. आपण आपले अंगभर घासून साबण लावत राहतो आणि नाण्याची वाट पाहात राहतो. साबण काही उरत नाही आणि नाणे काही सापडत नाही, अशी काहीशी परिस्थिती झाली होती.
जे लोक मान्सून सेल लावतात, ते उन्हाळ्यात पण सेल लावतच असतात. बरेच लोक स्वस्तात मिळतात म्हणून कपडे सेलमध्येच खरेदी करतात. सेल लावलेला व्यापारी भरपूर नफा कमवतो आणि स्वस्तात मिळाले म्हणून ग्राहकही खूश असतो.