

आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर त्यांचे स्वागत कसे करावे हा प्रश्नच पडत नाही. पाहुणे नुकतेच जेवून आलेले असले तरी थोडा चहा घेण्याचा आग्रह केला जातो आणि पाहुणे कितीही नाही म्हणत असतील तरी कपभर चहा पाजला जातोच. सहज रस्त्यात कोणी भेटला तर आपण त्याला म्हणतो, या एकदा चहा प्यायला. चहाचा कप हा एकमेकांचा आदर दर्शविणारा व पाहुण्यांचे स्वागत करणारा महत्त्वाचा घटक आहे. मराठी घरांमध्ये अचानक कुणी आले तर चहा करता यावा म्हणून अर्धा लिटर दूध राखून ठेवलेले असते. महानगरी भागांमध्ये लोक फोन करून येतात. परंतु ग्रामीण- नागरी भागात असे नसते.
राजकारणातही चहापान महत्त्वाचे असते. विधानसभेचे अधिवेशन असले की सत्ताधारी पक्ष विरोधकांना चहापानाला बोलावत असतो. कधीकाळी या प्रथेला सुरुवात झाली असेल तेव्हा हसत खेळत चहापान होत असावे. राजकारणातील विरोधक म्हणजे व्यक्तिगत जीवनातील शत्रू अशी आज असलेली परिस्थिती राज्यात कधीच नव्हती. विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांचा चहापानावर बहिष्कार ही बातमी गेली कित्येक वर्षे ठरलेली आहे. विरोधकांनी सामोपचाराने यायला हवे होते असे सत्ताधारी म्हणत असतात. हेच सत्ताधारी विरोधक होते तेव्हा त्याच चहापानावर बहिष्कार टाकत असत याचा त्यांना विसर पडलेला असतो.
चहापाणी एक सांकेतिक कृती आहे. अधिवेशन येण्यापूर्वीच हे अधिवेशन वादळी ठरणार ही बातमी हमखास असतेच असते. दरम्यानच्या काळात अधिवेशनात कुठले प्रश्न उभे करायचे आणि कुठल्या प्रश्नावरून सत्ताधार्यांना अडचणीत आणायचे याची फिल्डिंग विरोधी पक्षाने लावलेली असते. सत्ताधारीही काही कमी नसतात. कोणत्या प्रश्नावर आपल्याला घेरण्याचे प्रयत्न होतील हे लक्षात घेऊन ते सर्व उत्तरे आधीच तयार ठेवतात. अधिवेशन काळात हा संघर्ष टिपेला जातो. कारण अधिवेशनावर जनतेचे बारकाईने लक्ष असते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात मंत्री महोदय पूर्ण वेळ उपलब्ध असतात आणि त्यांच्याशी व्यक्तिश: भेटून आपल्या मतदारसंघातील कामे मार्गी लावण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. किमान एखाद्या तरी अधिवेशनाला विरोधकांनी चहापानावर बहिष्कार न टाकता हसत-खेळत चहापान करावे हे पाहण्याची आमची इच्छा आहे, तशी तुमचीही असेलच. विरोधक चहापानावर बहिष्कार टाकणार असतील तर मग चहापानावर का खर्च केला जातो हा मोठा प्रश्न आहे. समजा, विरोधकांना चहा आवडत नसेल तर अन्य काही आवडते का याचीही चौकशी सत्ताधारी पक्षांनी केली पाहिजे. कसे का होईना, परंतु अधिवेशनापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले तर अधिवेशनातून काहीतरी फळ जनतेला मिळू शकते हे निश्चित. विरोधक चहापानाला हजर आणि अधिवेशन वादळी न होता शांततेने पार पडले हे पाहायला मिळेल तो सुदिनच म्हणावा लागेल.