

कधीकाळी भारतामध्ये एवढी समृद्धी आणि सुरक्षितता होती म्हणतात की, काठीला सोने लावून लोक काशीला जात असत. ज्या काळामध्ये लॉकर नामक प्रकार नव्हते तेव्हा तुमची संपत्ती कुठे ठेवायची, हा मोठाच प्रश्न असे. परकीय आक्रमण, दरोडेखोरी यांचे धोके असल्यामुळे बरेचदा आपली संपत्ती सोने रूपात आणून हंड्यात ठेवून जमिनीखाली पुरून ठेवण्याची एक प्रवृत्ती होती. या कारणामुळेच आजकाल कुठे काही उत्खनन झाले, तर अचानक सोन्याच्या मोहरा सापडतात. क्वचित एखाद्या शेतामध्ये नांगर चालवताना खणखण आवाज येतो आणि सोन्याने भरलेली हंडी सापडते.
काळ बदलला तसे संपत्तीचे चलनवलन बदलत गेले. अवघ्या दहा वर्षांपूर्वी कुठे प्रवासाला जायचे असेल, तर तुम्हाला सोबत किमान काही ना काही तरी रक्कम बाळगावी लागत असे. तिकीट काढणे, खाद्यपदार्थ विकत घेणे, वस्तू विकत घेणे या सर्वांसाठी रोख रक्कम लागत असे. तुम्ही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत असाल, तर आपले पाकीट आणि पैसे सांभाळणे हे महत्त्वाचे कार्य तुमच्या हाती असे. बसमध्ये चढताना पाकीट मारणे किंवा रेल्वेमधून सामान गहाळ होणे असे प्रकार सर्रास होत. दरोडेखोरांपासून वाचण्यासाठी मग बँकांचे लॉकर आले आणि लोक खरे दागिने बँकेत आणि खोटे दागिने घालू लागले.
यूपीआय पेमेंट पद्धत आल्यापासून रोख रक्कम जवळपास अद़ृश्य झालेली आहे. कधीकाळी आपल्या लोकांना स्मार्ट फोन प्रत्येकाला मिळेल की नाही, याविषयी शंका होती. आज ग्रामीण भागापासून सर्वांकडे स्मार्ट फोन आलेले आहेत आणि त्याचा सर्रास वापर पेमेंट करण्यासाठी होत आहे. प्रत्येकाचे बँक अकाऊंट असल्यामुळे कुणालाही या माध्यमातून रक्कम स्वीकारणे शक्य झाले आहे. घराबाहेर पडायचे असल्यास तुम्हाला किमान काही पैसे घेऊन निघावे लागत असे, जसे की पेट्रोल टाकण्यासाठी, भाजी खरेदी करण्यासाठी, किराणा सामान आणण्यासाठी इत्यादी. आता सोबत पैसे बाळगण्याची गरज राहिली नाही. काठीला सोने बांधून काशीला जाण्यापेक्षा खिशामध्ये एक स्मार्ट फोन असेल आणि बँकेत रक्कम असेल, तर काशीच नव्हे तुम्ही अगदी न्यूयॉर्क, लंडनपण करून येऊ शकता.
यूपीआयचा पेमेंटसाठी वापर करणार्या देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे. याचे कारण की, प्रत्येकाचे अकाऊंट आहे आणि प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन आलेला आहे. विक्रेत्याकडे स्मार्ट फोन नसेल, तरी त्याला यूपीआय स्कॅन मिळते आणि गिर्हाईक स्मार्ट फोनने त्याच्यावर पेमेंट करत आहे. मध्यंतरी एका भाजीवालीचा फोटो व्हायरल झाला होता. एक गिर्हाईक भाजी खरेदी करते आणि तिला क्यूआर कोड कुठे आहे, असे विचारते. कारण, ते समोर ठेवलेले नसते. ती भाजीवाली पटकन तराजूचे जे भांडे आहे त्याच्या खालील बाजूला दाखवलेले क्यूआर कोड समोर करते आणि पेमेंट स्वीकारते. मंडळी, भारत हा महान देश आहे, याविषयी मनात काही शंका राहिलेली नाही.