Strobe Talbott | स्ट्रोब टॅलबॉट

Strobe Talbott |
Strobe Talbott | स्ट्रोब टॅलबॉट
Published on: 
Updated on: 

युवराज इंगवले

भारत - अमेरिकेचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी आणि माजी उपपरराष्ट्रमंत्री स्ट्रोब टॅलबॉट यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. १९९८ मध्ये भारताने केलेल्या अणुचाचण्यांनंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध अत्यंत तणावपूर्ण बनले होते. या कठीण काळात भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह आणि टॅलबॉट यांनी दोन्ही देशांमधील संवादाची प्रक्रिया सुरू ठेवून द्वीपक्षीय संबंधांना नवा आयाम दिला होता. भारत-अमेरिका संबंधांमधील हा काळ ऐतिहासिक मानला जातो. भारताच्या अणुचाचण्यांनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते. त्यामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली होती; मात्र जसवंत सिंह आणि टॅलबॉट यांच्यात झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांमुळे परस्पर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.

या संवादातून भविष्यातील भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीचा पाया मजबूत झाला. टॅलबॉट यांच्या भारतासाठीच्या योगदानाची दखल घेत २०११ मध्ये त्यांना विशेष सन्मान देण्यात आला होता. त्यावेळी रेडिफ या कंपनीच्या मालकीचे असलेल्या प्रतिष्ठित भारतीय-अमेरिकन वृत्तपत्र 'इंडिया अब्रॉड'ने त्यांना पहिला 'फ्रेंड ऑफ इंडिया ॲवॉर्ड' प्रदान केला होता. २०११ मध्ये झालेल्या 'इंडिया अब्रॉड पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. भारत - अमेरिका संबंध सुधारण्यासाठी तसेच दोन्ही देशांमधील मैत्री अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता. तो स्वीकारताना टॅलबॉट यांनी आनंद व्यक्त केला होता. टॅलबॉट यांचे भारताशी असलेले नाते केवळ राजनैतिक संबंधांपुरते मर्यादित नव्हते. भारताच्या राजकीय, आर्थिक आणि सामरिक महत्त्वाची त्यांना चांगली जाणीव होती.

भारत - अमेरिका या लोकशाही देशांनी परस्पर सहकार्य वाढवणे आवश्यक असल्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. १९९८ ते २००० या काळात तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह आणि टॅलबॉट यांच्यात भारत-अमेरिका संबंधांबाबत अनेक महत्त्वपूर्ण चर्चा झाल्या. यामध्ये अण्वस्त्र धोरण, सुरक्षा, जागतिक राजकारण आणि दोन्ही देशांमधील सहकार्य अशा विविध विषयांचा समावेश होता. या संवादामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची संधी मिळाली. तसेच अमेरिकेलाही भारताच्या सुरक्षाविषयक चिंता आणि धोरणात्मक दृष्टिकोन समजून घेण्यास मदत झाली.

टॅलबॉट यांची ओळख केवळ अमेरिकेचे माजी मुत्सद्दी म्हणून नव्हती, तर ते एक अभ्यासू विचारवंत, कुशल संवादक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जाणकार म्हणूनही ओळखले जात होते. त्यांनी भारत-अमेरिका संबंधांमधील कठीण काळात संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाण्याने आंतरराष्ट्रीय राजनैतिक क्षेत्रातील एका महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत. त्यांची बौद्धिक क्षमता, दूरदृष्टी, अभ्यासपूर्ण विचार आणि माणुसकी यांची कायम आठवण राहील. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांच्या इतिहासात टॅलबॉट यांचे योगदान नेहमीच आदराने स्मरणात ठेवले जाईल, हे मात्र नक्की!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.