

डॉ. संजय वर्मा, ज्येष्ठ विश्लेषक
सोशल मीडियाचा प्रसार आज सर्वदूर झालेला असून, त्याचा वापर दिवसागणीक वाढत आहे. विशेष म्हणजे या व्यासपीठावरून दिल्या जाणार्या माहितीचा समाजमनावर पडणारा प्रभाव हा सर्वमान्य झाला आहे. त्याचाच फायदा घेत सोशल मीडियाच्या विश्वात उपदेश देणार्या, सल्ला देणार्यांची भाऊगर्दी झाली आहे. यामध्ये बरेच जण त्या-त्या विषयातील पदवी व अनुभव असणारे आहेत; पण त्याच वेळी फुटकळ माहितीच्या आधारे, अल्गोरिदमचे तंत्र वापरून चक्क दिशाभूल करणारे सल्ले देणार्यांचेही या विश्वात पेव फुटले आहे.
सोशल मीडियामधील कोणत्याही प्लॅटफॉर्मवर गेल्यास असे एकही ठिकाण उरलेले नाही, जिथे शेकडो-हजारो उपदेशकांची फौज हजर नसते. यातील कोणाकोणाकडे अशा प्रकारचे शिक्षण, सल्ला किंवा उपदेश देण्यासंदर्भातील पदवी आहे किंवा अनुभव आहे, याची तपासणी करण्याचा कोणताही मार्ग नाही. पण, तरीही त्यांची भाऊगर्दी वाढतच आहे. असे म्हणतात की, ‘ज्ञान जिथूनही मिळेल, तिथून ते स्वीकारावे’ पण या तत्त्वाचा आणि त्यावर आधारित मानसिकतेचा सर्वाधिक परिणाम जर कुठे झाला असेल, तर तो सोशल मीडिया उपदेशकांच्या क्षेत्रातच झाला आहे.
फक्त प्रभावी भाषणे करून आज असंख्य लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण, तंत्रज्ञान, अध्यात्म, शेअर बाजार, आरोग्य अशा जीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रांतील ‘ज्ञानदाना’चे काम करत आहेत. शेअर बाजाराशी संबंधित ‘अचूक’ ज्ञान आणि टिप्स देणार्यांच्या विरोधात अलीकडील काळा बाजार नियामक संस्था सेबीने कडक पावले उचलण्यास सुरुवात केल्याने अनेकांनी दुकाने बंद केली आहेत. पण, त्यांच्या सल्ल्यांना ‘ब्रह्मवाक्य’ मानून त्यानुसार आर्थिक व्यवहार, ऑप्शन ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग करणारे हजारो जण देशोधडीला लागल्याचेही समोर आले आहे.म
उपदेशक असणे वाईट नाही. प्रत्येक काळात देश आणि समाजाला दिशा दाखवणारे, योग्य-अयोग्य यातील फरक सांगणारे विद्वान, विचारवंत, तत्त्ववेत्ते, ऋषी-मुनी, साधू-फकीर अस्तित्वात होतेच. ते आचार-विचार, आहार-विहार आणि वर्तनशैली कशी असावी, हे शिकवत. संत कबीर यांनी माणसाची वाणी ही मनाचा तोल न गमावणारी असावी, असा सल्ला दिला. महाराष्ट्रातील संतपरंपरेने सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. आजच्या संदर्भाने या सर्वांना ‘इन्फ्लूएंसर’ म्हणता येईल. पण, अलीकडच्या काही घटनांमध्ये अनेक उपदेशकांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीला मनालीपासून अयोध्या-काशीपर्यंत पर्यटकांची गर्दी उसळलेली होती. त्यावेळी सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले होते आणि त्यामध्ये गोव्याचे समुद्रकिनारे, हॉटेल्स इत्यादी रिकामे पडले आहेत, असा दावा केला होता. पण, गोवा सरकारने हे दावे खोटे ठरवून सोशल मीडिया इन्फ्लूएंसरवर मानहानीचा दावा करण्याची तयारी दर्शवली होती. सरकारचे म्हणणे होते की, काही इन्फ्लूएंसर एका टूलकिटचा वापर करून पर्यटकांना गोव्यापासून दुरावण्याचा प्रयत्न करत होते.
एका अंदाजानुसार देशात सध्या 40.6 लाखांहून अधिक सोशल मीडिया इन्फ्लूएंसर असून, त्यापैकी सुमारे 10 टक्के दर महिन्याला लाखो रुपये कमावतात. इन्स्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक यांसारख्या व्यासपीठांवर ते सर्व प्रकारचे ज्ञान वाटतात. भटकंती, स्वयंपाक, फॅशन टिप्सपासून व्हिडीओ संपादन आणि शेअर बाजारातील खेळाडू घडवण्यापर्यंतच्या शिकवणुकीत त्यांचा हिस्सा आहे. अशा हजारो इन्फ्लूएंसरांचे अनुयायी लाखोंमध्ये-कोट्यवधींमध्ये आहेत. अलीकडच्या वर्षांत विविध राजकीय पक्ष सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहेत आणि इन्फ्लूएंसरांची मदत घेऊ लागले. याचा अर्थ इतकाच की सोशल मीडिया उपदेशकांचा प्रभाव चांगला वा वाईट, पण समाजावर होत असतोच. त्यामुळेच ऑनलाईन वस्तू व सेवा विकणार्या कंपन्याही त्यांना विविध प्रकारे पैसे देऊन वापरतात. पण, येथे प्रश्न असा आहे की त्यांना योग्य मार्गावर आणण्याचे किंवा रोखण्याचे काम कोण करणार?
सोशल मीडियाने प्रत्येक व्यक्तीला मत मांडण्याचे व्यासपीठ दिले आणि नागरिकांना सक्षम केले. पण, लोकांनी काय पाहावे आणि काय नाही, हे सोशल मीडिया कंपन्या ठरवू लागल्या, तेव्हापासून या माध्यमाला नवे आयाम लाभले. अर्धवट माहिती देणार्या उपदेशकांचे यामुळे फावत गेले. यातील बहुतेकांकडे विषयाचे ठोस ज्ञान, डिग्री किंवा अनुभव नसतानाही, बोलण्याची शैली आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या जोरावर ते कोणतीही गोष्ट अशा पद्धतीने सादर करतात की सामान्य लोक सहज फसतात.
अनेक इन्फ्लूएंसर स्वतःची लोकप्रियता वापरून लोकांना निकृष्ट किंवा बनावट उत्पादने खरेदी करायला प्रवृत्त करतात. इंग्लंडमधील पोर्टस्माऊथ विद्यापीठाने केलेल्या संशोधनात आढळले की, 16 ते 60 वयोगटातील जवळपास 22 टक्के ग्राहकांनी इन्फ्लूएंसरच्या सल्ल्यावर बनावट उत्पादने विकत घेतली. ट्विटर, फेसबुक, व्हॉटस्अॅप, इन्स्टाग्राम यांनी फेक अकाऊंटवर बंदी घालण्याचे प्रयत्न केले; पण त्यांचा परिणाम फारसा झाला नाही. अनेक जण तर पैसे देऊन फॉलोअर्स आणि व्ह्यूज विकत घेतात, असेही समोर आले आहे.
देशातील तरुणांमध्ये शेअर बाजाराविषयी वाढत्या उत्सुकतेमुळे वित्तीय सल्ला देणार्या इन्फ्लूएंसरांची मोठी लाट उसळली; पण चौकशीत आढळले की, बहुतेकांकडे वित्तीय सल्ला देण्यासंदर्भातील डिग्रीच नाहीये. अनेकांनी स्वतःच्या तोट्याची भरपाई करण्यासाठी फ्युचर अँड ऑप्शनचे कोर्स विकले. काहींनी तर चॅनेल्स आणि डिजिटल माध्यमांवर गुंतवणुकीच्या पोस्ट टाकण्यासाठी लाखो रुपये घेतले. त्यामुळे शेअर बाजार नियामक सेबीला या इन्फ्लूएंसरांवर नियंत्रण आणावे लागले. आता तर अशी तरतूद सुचवली गेली आहे की, नोंदणीकृत दलालांद्वारेच इन्फ्लूएंसरना जाहिराती, इव्हेंटस् किंवा अन्य उपक्रमांसाठी जोडले जावे. तसेच त्यांना सेबीकडे नोंदणी करणे बंधनकारक करावे. हा निर्णय पूर्वीच घेतला गेला असता, तर अनेकांचे लाखो रुपये वाचले असते.
ही गोष्ट खरी आहे की, विषयाचे ज्ञान आणि अनुभव असलेले अनेक इन्फ्लूएंसर चांगली माहिती देतात; पण त्याच वेळी फुटकळ ज्ञान असतानाही केवळ अल्गोरिदमचे तंत्र वापरून ‘लोकप्रिय’ झालेले उपदेशक सामाजिक आणि आर्थिक जोखमी वाढवताहेत, हे नाकारता येत नाही. म्हणूनच त्यांच्या वर्तणुकीवर, सल्ल्यावर आणि उत्तरदायित्वावर नियंत्रण ठेवणे हे काम सोशल मीडिया कंपन्यांनी आणि काही प्रमाणात सरकारनेही ठरावीक नियम-कायद्यांनी करणे आवश्यक आहे.