Pudhari Editorial : मुलींतील परिवर्तनशील शैक्षणिक जागरुकता

Pudhari Editorial : मुलींतील परिवर्तनशील शैक्षणिक जागरुकता
Published on
Updated on

देशाचा गतवर्षाचा वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल नुकताच प्रदर्शित झाला. यानुसार मुलांपेक्षा मुलींमध्ये 12 वीनंतरचे शिक्षण सुरू ठेवण्याबाबतची इच्छा अधिक प्रमाणात असल्याचे एक आशादायक चित्र समोर आले आहे. (Pudhari Editorial)

देशाची वार्षिक शिक्षण स्थिती-2023 च्या अहवालात मुलांच्या तुलनेत मुली 12 नंतरचे शिक्षण सुरू ठेवण्याबाबत अधिक आग्रही असल्याचे निदर्शनास आले आहे. एकुणातच मुलींना शिक्षण घेण्याची आवड असल्याचे यावरुन लक्षात येते. हा अहवाल एका सर्वेक्षणाच्या आधारावर असून, मुलींमध्ये अभ्यासाची आवड असण्याबरोबरच शिक्षण घेण्यामागचे आणखी एक कारण सांगितले आणि ते म्हणजे उत्तम गृहिणी होण्यासाठी शिक्षण आवश्यक असल्याचा विश्वास. साधारणपणे मुले शिक्षण सुरू ठेवण्याबाबत उत्साही नसतील किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षण पुढे सुरू ठेवण्यास तयार नसतील तर कौटुंबिक आर्थिक जबाबदार्‍यांमुळे त्यांच्यावर दडपण असल्याचे गृहीत धरले जाते. प्रसंगी ते आपल्या कुटुंबाला, पालकांना विश्वासात न घेताही शिक्षण सोडू शकतात; पण मुलींना अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार फारसा नसतो किंवा त्यांच्या हातात काही नसते. मुलींकडून घेतले जाणारे नर्णय हे व्यक्तिगत नसतात, तर ते कुटुंबाच्या स्थितीवर अवलंबून असतात. (Pudhari Editorial)

'एएसईआर-2023' सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार मुलींच्या तुलनेत मुलांचा एक मोठा वर्ग बारावीनंतर शिक्षण घेण्यास फारसा उत्सुक नसतो. यावेळी मुलींनी मात्र किमान पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली, तर मुलांनी बारावीनंतर तत्काळ शिक्षण सोडून देण्याच्या शक्यतेवर चर्चा केली. मुलींच्या विवाहयोग्य वयासंदर्भातील सामाजिक निकषात झालेला बदल हे तरुण महिलांना भविष्यात उच्च शिक्षण घेण्याची क्षमता विकसित करण्याचे मोठे कारक बनले आहे. बहुतांश मुलींनी यासंदर्भात चर्चाही केली आणि 21 ते 22 वय होईपर्यंत शिक्षण घेण्यासाठी वेळ कसा मिळेल, याबाबत त्या जागरुक असल्याचे जाणवले. विवाहाचे वय पुढे ढकलल्याने एकप्रकारे उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेण्यासाठी या मुलींना सामाजिक रूपाने प्रशस्त मार्ग उपलब्ध करून दिला; मात्र पुढील शिक्षण हे कदाचित नोकरीच्या बाजारात चांगल्या तयारीसाठीदेखील असू शकते.

बहुतांश मुली सक्रिय रूपाने शिक्षण सुरू ठेवण्याबाबत का सजग असतात, असा प्रश्न निर्माण होतो. अहवालात म्हटले आहे, मुलींशी चर्चा करताना दोन कारणे समोर आली. पहिले म्हणजे शिक्षण हे त्यांना चांगली गृहिणी म्हणून समोर आणण्यास सक्षम करू शकते. शिक्षणापासून मिळणार्‍या फायद्याबाबत विचारले तर सीतापूरला दहावीत शिकणार्‍या एका मुलीने सांगितले की, घराचे व्यवस्थापन कसे करता येईल, हे आम्ही शिक्षणातून शिकू शकतो. दुसरे म्हणजे समोरच्या व्यक्तीशी कसे बोलायचे, स्वत:चे सादरीकरण कसे करायचे आणि जवळच्या लोकांचा सन्मान कसा करायचा, हेसुद्धा शिक्षणातून कळू शकते. या अहवालात म्हटले आहे, वास्तविकपणे अधिक शिक्षण घेतल्यामुळे अशा प्रकारचे परिणाम कधी दिसतील, हे मात्र सांगता येत नाही. लहान मुलांत नैतिक मूल्ये रुजविण्याबरोबरच सौंदर्य किंवा शिवणकामसारखा व्यावसायिक अभ्यासक्रम घेत भविष्यात वाटचाल करताना कौटुंबिक जबाबदारी पार पाडणे आणि काही उत्पन्न मिळवणे यासारख्या गोष्टींची शक्यताही मुलींच्या विचारात दडलेली होती. अहवालाच्या मते, शिक्षण घेण्यासंदर्भात आणखी एक सोपे कारण म्हणजे त्यांना शाळेत जाण्याची आवड असणे. शाळेत किंवा महाविद्यालयात गेल्याने त्यांना दैनंदिन धावपळीतून दिलासा मिळतो, असे काही मुलींचे म्हणणे आहे. मग घरातील कामांमुळे अभ्यासासाठी वेळ कमी मिळत असला तरी त्या शिक्षणाबाबत हट्टी दिसतात. (उदा. अभ्यास आणि घरातील काम यात ताळमेळ बसवताना मुलींच्या हाताशी वेळ राहत नाही. मग घरातील कामे आटोपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करावा लागतो किंवा रात्री अभ्यास करण्यामागचे कारण म्हणजे घरातील कामकाजामुळे कमी राहणारा वेळ) तसेच अनेकांना शाळेत जायला का आवडते, हेदेखील सांगितले. कारण त्यांना कौटुंबिक जबाबदार्‍यांपासून काही प्रमाणात मुक्ती मिळवण्याची एक संधी असते. त्यामुळे जेवढे शक्य आहे, तेवढे अभ्यास करण्यास इच्छुक असतात. (Pudhari Editorial)

या उलट 'एएसईआर' सर्वेक्षणातून एक गोष्ट निदर्शनास येते आणि ती म्हणजे मुलींच्या तुलनेत मुलांना बारावीपर्यंतचेच शिक्षण घेण्यास अधिक आवडते. अनेक मुलांनी लवकर पैसे कमावण्याची इच्छा प्रकर्षाने व्यक्त केली. ते म्हणतात, या वयात कितीतरी मुलांनी शाळेत असतानाच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काम करण्यास सुरुवात केलेली असते. म्हणजेच कुटुंबाला आर्थिक अडचण आलेली असेल किंवा त्यांच्या बहिणींना शुल्काच्या कारणावरून शाळेतून काढून टाकले असेल तर अशावेळी त्यांना काम करण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्याचवेळी शिक्षण सुरू ठेवायचे असेल तर त्यांना उत्पन्नाचा स्रोत शोधण्याशिवायही अन्य कोणताच पर्याय दिसत नाही. अर्थात, मुली आणि मुलांच्या चर्चेदरम्यान त्यांच्या इच्छा, प्राधान्यक्रमात स्पष्टता दिसून आली; मात्र गुणात्मक डेटा पाहिल्यास तरुणांना पुढचा मार्ग निवडताना स्वत:चा निर्णय महत्त्वाचा असतो.

अशावेळी लिंग भेदाभेद कळते. साधारणपणे मुलांना पुढचे शिक्षण घ्यायचे नसेल, तर ते अशावेळी कुटुंबाचा विचार न करताही निर्णय घेऊ शकतात. मुलींच्या बाबतीत असे घडत नाही. शिक्षण सुरू ठेवायचे की थांबायचे, याबाबतचे निर्णय त्यांच्या हातात नसतात, असे अहवालात म्हटले आहे. 'एएसईआर-2023 बियाँड बेसिक्स' सर्वेक्षण 26 राज्यांतील 28 जिल्ह्यात करण्यात आले आणि त्यात 14 ते 18 वयोगटातील एकूण 34,745 मुलांचा समावेश करण्यात आला. एएसईआर हे एक देशव्यापी देशांतर्गत सर्वेक्षण असून, ते ग्रामीण भागातील मुलांचे शालेय शिक्षण आणि शिकण्याच्या स्थितीचे आकलन करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news