

दिल्लीच्या मैदानावर नेते, अभिनेते हजेरी लावून गेले. त्यात भाई हे नावाजलेले बॉलीवूड प्रस्थ. भाईला आज झोप लागत नव्हती. काय करावे ते न सुचल्याने भाई घरातच असलेल्या जिमकडे वळले. थंडगार पेय ग्लासात ओतत भाईनी विचार केला तो आपल्या ऐन विशी-तिशीतल्या तारुण्याचा. बिनमिशीचा फोटो पाहात तारवटल्या डोळ्यात हसू चमकलं. ‘मी आता या वयाचा असतो तर?’ मिशीतल्या भाईंना प्रश्न छेडून गेला. ‘आता जेन झींसोबत मैदानात असतो’.
भाईनी नेहमीच्या सवयीने व्यायामाला सुरुवात करायच्या आधी स्वतःची एक मस्त क्लिक घेत सोशियल प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. शर्टलेस क्लिक हा आवडता नेहमीचा छंद. तो जोपासायची गरज भाईंना कधीच भासली नाही. छंदच आजकाल भाईंना विचारतो या कॅमेऱ्यामध्ये मला कधी क्लिक करताय? भाईंच्या चेहऱ्यावर नेहमी रागच रेंगाळत असतो एरवी. सेल्फी क्लिकसाठी जोशात आलेल्या छंदाला असा एखाद्या वेळेस प्रश्न पडू शकतो. त्यात काही गैर नाही. हा खास मूड भाई हमखास क्षणाला वापरण्याची तरतूद जिममध्ये असताना करत असतात. रिकामा वेळ आणि मूड या दोन्हीची योग्य सांगड घालत आजवर भाईंनी बॉलीवूडला जिंकल्याचे ऐकले होते. पण मैदानावरच्या कुस्तीसापेक्ष खेळात प्रत्यक्ष भाग न घेता बाजी मारल्याचं आत्ताच सूत्रांकडून कळले.
त्रिसूत्री (मुख्य जेन झी) मैदानावर विचलित झाल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी भाईंनी मैदानाकडे धाव घेत आश्वासन देऊन टाकले. ’मी तुमच्या बाजूने आहे. सगळं ठीक होणार आहे. मी तुमच्यासोबत सदैव असेन. घरी परत जा.’ (भाई निघून जातात) यावर एका ताऱ्याचे मनोगत माध्यमांनी वायरल केले. भाई घाबरले म्हणून! पण भाई तर पुढच्या पोस्टची तयारी करण्यासाठी निघून गेले. ‘जो डर गया वो मर गया.’ ‘इटस् डन जेन झी. वापस जाओ. काम हो गया. फुल अँड फायनल गेम ओव्हर! थोड्याच वेळात हे कथित वाक्य सत्यात उतरलं. जेन झीचं स्वप्न खरं झालं. भाई म्हणजे दैवतच.
दिल्ली असो वा गल्ली, भाईंचे नाव प्रत्येक जेन झींच्या तोंडी. ‘मैं एक बार ही बोलता हुं, और वो फुल अँड फायनल हो जाता है’. आता कोण फूल बनलं आणि फायनली आऊट झालं, हे वाक्य द्विअर्थी घ्यायला हरकत नाही. शेवटी विद्यार्थी यशस्वी झाले ते भाईंच्या या पोस्टमुळे, अशी चर्चा सूत्रांनी सगळीकडे व्हायरल करून टाकली आणि भाईंच्या चित्रपटाचं काही होऊदे, सध्या प्रसिद्धी मिळवून देणारी पोस्ट भाईंसाठी पुरेशी आहे म्हणायला हरकत नाही.