

जगात जे कुठे घडत नाही, ते मराठवाड्यात घडत असते. देशात आणि राज्यात रस्त्यांची स्थिती बरी होत असली, तरी मराठवाड्यातील प्रश्न कायम आहेत. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा प्रश्न वाहनचालकांना नेहमी पडत असतो. सातत्याने होणारे अपघात मराठवाड्याला काही नवीन नाहीत. ब्लॅक कॉटन सॉईल म्हणजेच भुसभुशीत काळी माती असल्यामुळे येथील रस्ते टिकत नाहीत, असा युक्तिवाद केला जातो. रस्ता तयार करताना काळी माती पूर्ण काढून त्यात मुरूम भरून ते तयार केले, तर दीर्घकाळ टिकू शकतात, हेही दिसून आले आहे. मराठवाड्याच्या नांदेडने आता एक नवीनच विक्रम प्रस्थापित केला आहे आणि तो म्हणजे चक्क विमानतळाच्या धावपट्टीवरच खड्डे पडले आहेत, ज्यामुळे विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.
नांदेड विमानतळावरून हैदराबाद, मुंबई, पुणे, बंगळूर अशा मर्यादित विमानसेवा सुरू असतात. नांदेड हे शहर नजीकच्या निजामाबाद, आदिलाबाद, परभणी, हिंगोली, लातूर या शहरांना जवळ पडते, त्यामुळे येथील विमानांना प्रवाशांची कधीही कमतरता भासत नाही. विशेषत:, तातडीचे वैद्यकीय उपचार पाहिजे असतील, तर रुग्णांसाठी आधी नांदेड गाठणे आणि तिथून मुंबई किंवा हैदराबादला जाणे सोपे झाले होते. नुकताच मराठवाड्याच्या सर्व भागात भरपूर पाऊस पडून गेला. नांदेडमध्ये तर गोदावरी नदीला पूरही आला होता.
या सलग पडणार्या पावसामुळे नांदेडच्या विमानतळावरील धावपट्टीवर खड्डे पडले आणि त्यामुळे विमानसेवा पूर्णतः बंद करावी लागली, हे एक आश्चर्य म्हणावे लागेल. नांदेड विमानतळ तसे फारसा जुने नाही. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत धावपट्टीवर खड्डे पडण्याची माहिती जुनी झाली असेल, असे वाटत नाही. विमान कंपन्या विमान सेवा देण्यास तयार होत्या; परंतु विमानतळ प्राधिकरणाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनिश्चित काळासाठी येथील विमानसेवा बंद केली आहे.
अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे येथील सुरक्षा आणि इतर व्यवस्थांमध्ये अत्यंत गंभीर अशा त्रुटी सापडलेल्या आहेत. दर आठवड्याला 5 हजार प्रवाशांची ने-आण करणारे हे विमानतळ अग्निशमन सुविधा परिपूर्ण नसलेले होते. धावपट्टीवरील खड्डे, अग्निशमन व्यवस्था पुरेशी नाही, उपग्रहाबरोबर अचूक संदेशवहन नाही, यामुळे कुठलाही अपघात कधीही होऊ शकला असता. अर्थात, सर्वोच्च केंद्रीय यंत्रणेने हे विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद करून टाकले आहे. आधीच मराठवाड्यामध्ये विकासाची वानवा आहे. रुग्ण आणि इतर प्रवाशांना ने-आण करणारे हे विमानतळ बंद पडल्यामुळे मराठवाड्याच्या समस्येत आणखी एकाने भर पडली आहे. विमानतळ ऐनवेळी कुठलीही पूर्व सूचना न देता बंद केल्यामुळे प्रवासी वैतागले होते, हे दिसून आले; परंतु एका प्रवाशाने ‘अपघात टळला हे आमचे नशीब होते,’ अशी पण प्रतिक्रिया दिली आहे.