100 Years Of RSS: संघाच्या शाखा म्हणजे व्यक्तिमत्त्व घडवणार्‍या यज्ञ वेदी; नरेंद्र मोदींचा विशेष लेख

Rashtriya Swayamsevak Sangh 100 years: विविध क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या प्रत्येक संस्थेचा उद्देश एकच आहे, भावनाही एकच आहे आणि ती म्हणजे, देश सर्वप्रथम!
RSS founded 100 years ago on dussehra
PM Narendra ModiPudhari File Photo
Published on
Updated on

Rashtriya swayamsevak sangh 100 years narendra modi

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

शंभर वर्षांपूर्वी विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. जेथे राष्ट्र भावना वेळोवेळी त्या काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी नवनव्या स्वरूपांमध्ये प्रकट होते, त्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेची ही पुनर्स्थापना होती. या युगात संघ त्याच अनादि राष्ट्र भावनेचा पुण्यावतार आहे. संघाच्या शताब्दी वर्षासारखा उज्ज्वल प्रसंग पाहायला मिळतो आहे, हे या पिढीतील स्वयंसेवकांचे भाग्यच आहे.

मी यानिमित्ताने देशसेवेच्या निश्चयाला वाहून घेतलेल्या कोट्यवधी स्वयंसेवकांना शुभेच्छा देतो. तसेच मी संघाचे संस्थापक आणि सर्वांचे आदर्श असलेले परम पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्या चरणी आदरालंजी अर्पण करतो. संघाच्या या शतकभराच्या गौरवपूर्ण प्रवासाची आठवण म्हणून भारत सरकारने विशेष टपाल तिकीट आणि नाणीही जारी केली आहेत. ज्या पद्धतीने विशाल नद्यांच्या किनार्‍यांवर मानवी संस्कृतीची जोपासना होते, त्याच पद्धतीने संघाच्या आधारानेही शेकडो आयुष्ये फुलली-फळली आहेत. ज्याप्रमाणे एक नदी ज्या ज्या मार्गांवरून वाहते त्या क्षेत्रांना स्वतःच्या पाण्याने समृद्ध करत जाते, त्याच पद्धतीने संघाने या देशातील प्रत्येक भागाला, समाजाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला. जशी एक नदी अनेक प्रवाहांतून स्वतःचे रूप दाखवते, संघाची वाटचालही तशीच आहे. संघाच्या वेगवेगळ्या संस्थासुद्धा जीवनाच्या प्रत्येक पैलूशी स्वतःला जोडून घेऊन देशाची सेवा करतात. समाजातील शिक्षण, कृषी, समाज कल्याण, आदिवासी कल्याण आणि महिला सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये संघ अविरतपणे कार्य करत आला आहे. विविध क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या प्रत्येक संस्थेचा उद्देश एकच आहे, भावनाही एकच आहे आणि ती म्हणजे, देश सर्वप्रथम!

RSS founded 100 years ago on dussehra
Mohan Bhagwat : श्रीमंत गरीब दरी वाढतेय... प्रस्थापित अर्थव्यवस्थेत दोष... मोहन भागवत यांचं 'विकासा'बाबत मोठं वक्तव्य

स्थापनेपासूनच संघाने देश घडवण्याचे प्रचंड उद्दिष्ट निश्चित कन वाटचाल केली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघाने व्यक्तीच्या घडणीतून राष्ट्र उभारणीचा मार्ग निवडला आणि आणि या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी जी कामाची पद्धत निवडली ती म्हणजे नित्यनेमाने शाखा भरवणे. संघाच्या शाखेचे मैदान, ही अशी एक प्रेरणादायक भूमी आहे जेथून प्रत्येक स्वयंसेवकाचा ‘अहम्पासून वयम्’च्या दिशेने प्रवास सुरू होतो. संघाच्या या शाखा म्हणजे व्यक्तिमत्त्व घडवणार्‍या यज्ञ वेदी आहेत. देश उभारणीचा महान उद्देश, व्यक्ती घडवण्याचा सुस्पष्ट मार्ग आणि शाखेसारखी सोपी, सजीव कार्यपद्धत हेच घटक संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आधारस्तंभ बनले. याच स्तंभांवर पाय घट्ट रोवून संघाने लाखो स्वयंसेवक घडवले आणि आज ते विविध क्षेत्रांमध्ये देशाला पुढे घेऊन जात आहेत. संघ जेव्हापासून अस्तित्वात आला, तेव्हापासून संघासाठी देश हेच प्राधान्य राहिले आहे, त्यासाठी तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्यलढ्यात संघाने असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे रक्षण केले आहे, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले. स्वातंत्र्यानंतरही संघ राष्ट्रसाधनेत अखंड झटत राहिला. या प्रवासादरम्यान संघाविरुद्ध कट-कारस्थाने रचली, संघाला नामशेष करण्याचे प्रयत्न झाले. ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या परमपूज्य गुरुजींना खोट्या खटल्यात अडकवले; पण संघाच्या स्वयंसेवकांनी कधीही कटुता येऊ दिली नाही. कारण, त्यांना माहीत आहे की, आपण समाजापासून वेगळे नाही, समाज आपल्यापासून तर बनलेला आहे. समाजाशी एकरूपता आणि घटनात्मक संस्थांवरील विश्वासामुळे संघाचे स्वयंसेवक प्रत्येक संकटात स्थितप्रज्ञ राहिले, समाजाप्रति संवेदनशील राहिले आहेत.

सुरुवातीपासूनच संघ देशभक्ती आणि सेवेचा पर्याय राहिला आहे. फाळणीच्या वेदनेमुळे लाखो कुटुंबे बेघर झाली तेव्हा स्वयंसेवकांनी निर्वासितांची सेवा केली. प्रत्येक आपत्तीमध्ये संघाचे स्वयंसेवक मर्यादित साधनसंपत्तीसह सर्वात पुढे उभे राहिले. ही केवळ मदत नव्हती, तर ते राष्ट्राच्या आत्म्याला बळकटी देण्याचे कार्य होते. स्वतः त्रास सोसून इतरांचे दुःख निवारण करणे, ही प्रत्येक स्वयंसेवकाची ओळख आहे. आजही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक सर्वात आधी पोहोचणार्‍यांपैकी एक असतात.

RSS founded 100 years ago on dussehra
PM Modi RSS 100th Year : इतिहासात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र... नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?

आपल्या 100 वर्षांच्या या प्रवासात संघाने समाजातील विविध घटकांमध्ये आत्मबोध जागवला. स्वाभिमान जागवला. संघाने देशातील दुर्गम भागातही काम केले, जिथे पोहोचणे सर्वात कठीण आहे. तेथे संघ अनेक दशकांपासून आदिवासी परंपरा, आदिवासी रीतीरिवाज, आदिवासी मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यात योगदान देतोय, कर्तव्य पार पाडतोय. आज सेवाभारती, विद्याभारती, एकल विद्यालय आणि वनवासी कल्याण आश्रम आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाचे आधारस्तंभ म्हणून उदयाला आले आहेत. अनेक शतकांपासून समाजात रुजलेल्या कूप्रथा, श्रेष्ठ आणि कनिष्ठ भेदभाव, ज्या वाईट पद्धती आहेत, त्या हिंदू समाजासाठी खूप मोठे आव्हान आहेत. ही एक गंभीर चिंता आहे, ज्यावर संघ निरंतर काम करत आहे. डॉ. हेडगेवार यांच्यापासून ते आजपर्यंत संघाच्या प्रत्येक महान व्यक्तीने, प्रत्येक सरसंघचालकाने भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. परमपूज्य गुरुजींनी ‘न हिंदू पतितो भवेत’ या भावनेला सातत्याने प्रोत्साहन दिले. पूज्य बाळासाहेब देवरस म्हणायचे, ‘जर अस्पृश्यता पाप नसेल, तर जगात कोणतेही पाप नाही!’ सरसंघचालक म्हणून काम पाहिलेले पूज्य रज्जू भैया आणि पूज्य सुदर्शन यांनीही ही भावना पुढे नेली. विद्यमान सरसंघचालक आदरणीय मोहन भागवत यांनीही समरसतेसाठी समाजासमोर एक विहीर, एक मंदिर आणि एक स्मशानभूमीचे स्पष्ट ध्येय ठेवले आहे.

जेव्हा 100 वर्षांपूर्वी संघ अस्तित्वात आला तेव्हा त्या काळातील गरजा आणि संघर्ष वेगळे होते; परंतु आज 100 वर्षांनंतर भारत विकसित होण्यासाठी वाटचाल करत असतानाची आजच्या काळातील आव्हाने वेगळी आहेत, संघर्ष वेगळे आहेत. इतर देशांवरील आर्थिक अवलंबित्व, एकता तोडण्याची कट-कारस्थाने, लोकसंख्याशास्त्रीय बदलाची कारस्थाने या आव्हानांचे आपले सरकार वेगाने निराकरण करत आहे. मला आनंद आहे की, संघानेही या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक ठोस पथदर्शी आराखडा बनवला आहे. आत्मबोध, सामाजिक समरसता, कौटुंबिक प्रबोधन, नागरी शिष्टाचार आणि पर्यावरण हे पाच संकल्प अर्थात संघाचे पंच परिवर्तन हे देशासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी प्रत्येक स्वयंसेवकासाठी एक विशाल प्रेरणा आहेत. नागरी शिष्टाचारांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकामध्ये नागरी कर्तव्याची भावना जागृत केली पाहिजे. या सर्वांसोबतच पर्यावरणाचे रक्षण करून भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित केले पाहिजे. या संकल्पांसह संघ आता पुढील शतकातील प्रवासाला सज्ज झाला आहे. 2047 च्या विकसित भारतासाठी संघाचे प्रत्येक योगदान राष्ट्राला ऊर्जा आणि प्रेरणा देईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news